तालिबानी नेत्यांची पाकिस्तानमधील उपस्थिती हा अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्त्वाला धोका

- अफगाणिस्तानची टीका

वॉशिंग्टन – तालिबानच्या नेत्यांची पाकिस्तानमधील उपस्थिती व त्यांच्याकडून प्रशिक्षण तळांना दिलेली भेट या गोष्टी अत्यंत गंभीर असून त्याने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्त्वाला धोका निर्माण झाल्याची टीका अफगाणी परराष्ट्र विभागाने केली आहे. काही दिवसांपूर्वी तालिबानशी संबंधित सोशल मीडिया अकाऊंट्सवरून व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. त्यात शांतीचर्चेत सहभागी असणारे तालिबानचे नेते पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण तळांना भेट देताना दाखविले आहेत. तालिबानचा उपप्रमुख अब्दुल गनी बरादर याने शांतीचर्चेतील सर्व निर्णय पाकिस्तानमधील तालिबानच्या नेत्यांशी चर्चा करूनच घेतले जातात, असेही वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.गेल्या काही महिन्यांपासून कतारमध्ये अफगाणिस्तान सरकार व तालिबानमध्ये शांतीप्रक्रियेबाबत चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच अफगाणिस्तानातील तालिबानच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.

गेल्या तीन महिन्यांमध्ये तालिबानने अफगाणिस्तानात 38 आत्मघाती हल्ले तर 507 बॉम्बस्फोट केले आहेत. यामध्ये 487 हून अफगाणींचा बळी गेला असून हजारांहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या सरकारने प्रसिद्ध केली होती. या वाढत्या हिंसाचारामुळे अफगाणिस्तान सरकार व जनतेमध्ये तालिबानविरोधातील भावना तीव्र होत चालल्याचे समोर येत आहे.या पार्श्‍वभूमीवर तालिबान व पाकिस्तानच्या जवळिकीचे तसेच पाकिस्तानमधील प्रशिक्षण तळांचे व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याने अफगाणिस्तानात खळबळ उडाली आहे.

अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून व्हिडिओत दाखविण्यात आलेल्या घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘अफगाणिस्तानमधील बंडखोर गट व त्यांच्या नेत्यांचा पाकिस्तानमधील राजरोस वावर तसेच उपस्थिती हे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्त्वाचे उघड उल्लंघन आहे. यामुळे या क्षेत्रात अस्थैर्य व संकटाला आमंत्रण मिळू शकते. त्याचवेळी ही बाब अफगाणिस्तानमधील शांततेसाठी गंभीर आव्हान ठरते’, असे टीकास्त्र अफगाणिस्तानच्या परराष्ट्र विभागाने सोडले आहे.हिंसा व रक्तपात घडविणाऱ्या गटांना पाकिस्तान सरकारने थारा देऊ नये, अशी मागणीही अफगाणिस्तानने केली.

अफगाण समस्येवर शांततापूर्ण तोडगा हवा असेल तर बंडखोर व दहशतवाद्यांची आश्रयस्थाने ताबडतोब बंद व्हायला हवीत, अशी अफगाणिस्तान सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचेही परराष्ट्र विभागाने बजावले आहे. तालिबानच्या नेत्यांकडून पाकिस्तानमधील प्रशिक्षण तळांना दिलेल्या भेटीवरही ताशेरे ओढण्यात आले आहेत.तालिबानच्या नेत्यांची भेट व वक्तव्ये असणारे तीन व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. यातील एका व्हिडिओत, तालिबानचा उपप्रमुख अब्दुल गनी बरादर वक्तव्य करताना दाखविला आहे. तालिबानचे संपूर्ण नेतृत्त्व पाकिस्तानात असून त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय शांतीचर्चेत कोणताही निर्णय होत नाही, असे बरादर यांनी म्हटले आहे. दुसऱ्या व्हिडिओत तालिबानचा नेता मुल्ला फझल अखुंद पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळाला भेट देताना दाखविला आहे. तर तिसऱ्या व्हिडिओत उपप्रमुख बरादर अफगाणिस्तानमधील तालिबानच्या नेत्याची पाकिस्तानामध्ये भेट घेताना दाखविण्यात आले आहे.

leave a reply