चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा नव्या शीतयुद्धाच्या विरोधात इशारा

नवे शीतयुद्धबीजिंग – डॅव्होस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ला संबोधित करताना चीनचे राष्ट्राध्यक्ष ‘शी जिनपिंग’ यांनी नव्या शीतयुद्धाच्या विरोधात इशारा दिला. ‘काही देशांचा गट तयार करून नवे शीतयुद्ध सुरू करणे, इतरांना नाकारणे किंवा त्यांना धमकावणी व आव्हान देणे, यामुळे जगात अधिकाधिक फूट पडत राहील’, असे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी बजावले. काही दिवसांपूर्वी अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेतलेल्या राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाला चीनच्या राष्ट्राध्यक्षांना हा संदेश दिल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

व्हर्च्युअल माध्यमाद्वारे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ही बैठक राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी संबोधित केली. या बैठकीत नव्या शीतयुद्धाच्या विरोधात इशारा देऊन जिनपिंग यांनी आपला देश बहुस्तंभीय जागतिक व्यवस्थेचा पुरस्कर्ता असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना, या देशाने नवे शीतयुद्ध छेडले होते व ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकेला एकमेव महासत्ता म्हणूनच जागतिक व्यवस्था उभी करायची होती, असे संकेत राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी देण्याचा प्रयत्न केला. मात्र चीनला अशी व्यवस्था नको असून चीन बहुदेशीय व्यवस्थेचा पुरस्कार करणारा देश असल्याचे चित्र जिनपिंग यांनी आपल्या भाषणातून उभे केल्याचे दावे माध्यमे करीत आहेत.नवे शीतयुद्ध

कोरोनाची साथ आलेली असताना, जगभरातील सर्वच देश आर्थिक संकटात सापडले होते. पण अशा काळातही चीन आर्थिक प्रगती करीत राहणारा एकमेव देश होता, असे सांगून चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी या भाषणात आपली पाठ थोपटून घेतली. त्याचवेळी अमेरिकेच्या नव्या प्रशासनाला चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी नव्या शीतयुद्धाला तोंड फोडू नका, असा इशाराही दिला आहे. याने जगात अधिकाधिक फूट पडेल व विघटन होत राहिल, असे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी बजावले आहे. मात्र हा इशारा देत असताना, जिनपिंग यांनी अमेरिकेचा थेट नामोल्लेख करण्याचे टाळले.

याबरोबरचचीन २०३० सालापर्यंत आपल्या देशातून होणारे कार्बन उत्सर्जन ६५ टक्क्यांनी कमी करणार असल्याचा दावा चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. ‘२०६० सालापर्यंत ‘कार्बन न्यूट्रॅलिटी’ साध्य करणे हे चीनचे ध्येय आहे. यासाठी चीनला खडतर परिश्रम करावे लागतील. मात्र प्रदूषणाचा सार्‍या मानवजातीला धोका निर्माण झालेला असताना, चीनला या आघाडीवर प्रयत्न करूनु हे ध्येय साध्य करावेच लागेल’, अशी आदर्शवादी भूमिका चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी मांडली. याबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या व आघाडीवरील अडथळे, गुंतवणूक व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण व विकसनशील देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रतिनिधित्त्व या मुद्यांवर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपली भूमिका मांडली.

दरम्यान, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला संबोधित करणार्‍या या भाषणात चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या देशाची प्रतिमा उजळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचे दिसत आहे. मात्र चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे आदर्शवादी दावे आणि या देशाच्या कारवाया यामध्ये फार मोठी तफावत आहे. नव्या शीतयुद्धाच्या विरोधात इशारे देणारे चीनचे राष्ट्राध्यक्ष आपल्या क्षेत्रातील छोट्या देशांना धमकावून त्यांच्या अधिकारक्षेत्रावर आपला हक्क सांगत आहेत. तसेच बलप्रयोगाची धमकीही देत आहेत. या छोट्या देशांनी आघाडी उभी करून दुसर्‍या देशांचे सहाय्य घेण्याची तयारी केली की मग मात्र ती शीतयुद्धाची मानसिकता ठरते, असे आरोप चीनकडून केले जातात. या दुटप्पीपणामुळे चीन विश्‍वासार्हता गमावून बसलेला आहे. याचबरोबर आपल्या आर्थिक प्रगतीचे दिमाखदार आकडेवारी चीनकडून सादर केली जात असली, तरी त्यात तथ्य नसून चीन जाहीर करीत असलेल्या आकडेवारीवर विश्‍वास ठेवता येणार नाही, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

असे असतानाही, जगभरातील प्रमुख देशांनी चीनची गुंतवणूक, ५जी तंत्रज्ञान यासाठी चीनला अनुकूल असलेली भूमिका स्वीकारावी, अशी चीनची मागणी आहे. त्यासाठी चीन आग्रही भूमिका स्वीकारत आहे. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या भाषणातून हीच बाब अधोरेखित होत आहे.

leave a reply