‘सीआयए’च्या प्रमुखांची रशियाला भेट

‘सीआयए’मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिकेची प्रमुख गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स अमेरिकी शिष्टमंडळासह रशिया दौर्‍यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या सूचनेनंतर ही भेट घेण्यात आल्याची माहिती रशियातील अमेरिकी दूतावासाच्या प्रवक्त्यांनी दिली. अमेरिका व रशियामधील तणाव वाढला असून दोन्ही देशांनी परस्परांच्या दूतावासातील अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांची हकालपट्टी केली आहे.

मंगळवारी सीआयएचे प्रमुख बर्न्स शिष्टमंडळासह रशियात दाखाल झाले. मंगळवार व बुधवार असे दोन दिवस बर्न्स व अमेरिकी शिष्टमंडळ रशिया दौर्‍यावर असून वरिष्ठ अधिकारी तसेच नेत्यांशी चर्चा करतील, असे सांगण्यात येते. रशियात दाखल झाल्यावर सीआयएच्या प्रमुखांनी रशियाच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे सचिव निकोलाय पत्रुशेव्ह यांची भेट घेऊन बोलणी केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर रशियातील एका शिष्टमंडळाशीही चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आखातातील संघर्ष, इराणचा अणुकार्यक्रम, सायबरहल्ले, हेरगिरी, युक्रेन व ऍलेक्स नॅव्हॅल्नी अशा विविध मुद्यांवरून सध्या अमेरिका व रशियातील संबंध ताणले गेले आहेत. आजीमाजी अधिकारी तसेच विश्‍लेषकांनी केलेल्या दाव्यांनुसार, दोन देशांमधील संबंध शीतयुद्धाच्या काळानंतर रसातळाला जाऊन पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांनी परस्परांच्या दूतावासातील अधिकारी व कर्मचार्‍यांची हकालपट्टीही केली होती.

दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पावले उचलल्याचे चित्र समोर येत आहे. जून महिन्यात बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व्हिक्टोरिआ नूलँड यांनी रशियाला भेट दिली होती. त्यापाठोपाठ आता सीआयएचे प्रमुख शिष्टमंडळासह दाखल झाल्याने दोन देशांमधील संबंधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

leave a reply