काबुलमधील ‘आयएस’च्या हल्ल्यात हक्कानी नेटवर्कचा वरिष्ठ कमांडर ठार

वरिष्ठ कमांडरकाबुल/पेशावर – अफगाणिस्तानच्या काबुलमधील रुग्णालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये तालिबानमधील हक्कानी नेटवर्क गटाचा वरिष्ठ कमांडर हमदुल्ला मुखलिस ठार झाला. तालिबानमधील सर्वात प्रभावशाली असलेल्या हक्कानी नेटवर्कसाठी हा सर्वात मोठा हादरा ठरतो. याचे पडसाद पाकिस्तानात उमटले असून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने काबुलच्या रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. हक्कानी नेटवर्कची सूत्रे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’कडून हलविली जातात. त्यामुळे मुखलिस याच्या हत्येने पाकिस्तानची तीव्र प्रतिक्रिया उमटणे ही स्वाभाविक बाब ठरते.

मंगळवारी सकाळी काबुलच्या वझिर अकबर खान भागातील ‘सरदार मोहम्मद दाऊद खान’ लष्करी रुग्णालयावर दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यात २५ जण ठार तर ५० जण जखमी झाले. अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर तळ असलेल्या ‘आयएस-खोरासन’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. आयएसच्या पाच दहशतवाद्यांनी हा हल्ला चढविल्याचे सदर संघटनेने सोशल मीडियावर जाहीर केले.

सुरुवातीला तालिबानने या हल्ल्याची माहिती देण्याचे टाळले होते. पण हक्कानी नेटवर्कचा वरिष्ठ कमांडर हमदुल्ला मुखलिस यात ठार झाल्याचे उघड झाल्यानंतर तालिबानने सदर हल्ल्याची माहिती उघड केली. १५ ऑगस्ट रोजी काबुलमधील राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानवर तालिबानने ताबा मिळविला होता, तेव्हा हमदुल्ला मुखलिस या गटाचे नेतृत्व करीत होता. राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात खुर्चीवर बसलेला मुखलिस व आजूबाजूला हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी उभे असलेला फोटो आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला होता.

मुखलिस हा हक्कानी नेटवर्कमधील ‘बद्री ३१३ ब्रिगेड’ या विशेष पथकाचा प्रमुख होता. राजधानी काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी मुखलिसच्या बद्री ३१३ ब्रिगेडकडे आहे. त्याचबरोबर हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आणि तालिबानच्या राजवटीत अंतर्गत सुरक्षामंत्री असलेल्या सिराजुद्दीन हक्कानीचा विश्‍वासू साथीदार म्हणून मुखलिसकडे पाहिले जात होते. त्यामुळे मुखलिस मारला गेल्याने हक्कानी नेटवर्कला जबर धक्का बसल्याचा दावा केला जातो. येत्या काही दिवसात याचे पडसाद अफगाणिस्तानात उमटतील, असा दावा अफगाणी पत्रकार करीत आहेत.

तालिबान आणि आयएस, या दोन दहशतवादी संघटना येत्या काळात सूडाने पेटून उठतील व एकमेकांच्या कमांडर्सची हत्या घडवतील, असा दावा अमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने काही दिवसांपूर्वी केला होता. अमेरिकेचे प्रशिक्षण मिळालेली अफगाणी गुप्तचर यंत्रणा व स्पेशल फोर्सेसचे जवान तालिबानविरोधात आयएसमध्ये सहभागी झाले आहेत. आयएसचे हे दहशतवादी तालिबानवर भीषण हल्ले चढवतील, असा इशारा अमेरिकी वर्तमानपत्राने दिला होता. पण अफगाणी जवान आयएसमध्ये सहभागी झालेले नाहीत, असे सांगून तालिबानने सदर बातमी फेटाळली होती.

leave a reply