२०२४ सालच्या निवडणुकीनंतर अमेरिकेत लष्करी बंडाळीसह गृहयुद्धाचा भडका उडेल

- माजी लष्करी अधिकार्‍यांचा इशारा

गृहयुद्धाचा भडकावॉशिंग्टन – अमेरिकेमध्ये २०२४ साली होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर लष्करात फूट पडण्याची शक्यता असून त्यातून अमेरिकेत गृहयुद्धाचा भडका उडेल, असा खळबळजनक इशारा माजी लष्करी अधिकार्‍यांनी दिला आहे. शुक्रवारी अमेरिकेतील एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात हा इशारा देण्यात आला. इशारा देणार्‍या अधिकार्‍यांमध्ये निवृत्त मेजर जनरल पॉल इटन, निवृत्त ब्रिगेडिअर जनरल स्टिव्हन अँडरसन व निवृत्त मेजर जनरल अँटोनिओ तगुबा यांचा समावेश आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील एका विश्‍लेषकाने राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची सत्ता उलथण्यासाठी अमेरिकेतील दोन ते तीन कोटी नागरिक हातात शस्त्र घेऊ शकतात, असा दावा केला होता.

‘द वॉशिंग्टन पोस्ट’मधील ‘ओपिनिअन’ या सदरात ‘थ्री रिटायर्ड जनरल्स: द मिलिटरी मस्ट प्रिपेअर नाऊ फॉर ए २०२४ रिसरेक्शन’ नावाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात तीन माजी लष्करी अधिकार्‍यांनी, अमेरिकी संसदेत झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख करीत नव्या बंडाचा इशारा दिला. ६ जानेवारी रोजी अमेरिकी संसद व परिसरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये संरक्षणदलाशी संबंधित अनेक आजीमाजी अधिकारी तसेच जवानांचा समावेश होता, याकडे निवृत्त अधिकार्‍यांनी लक्ष वेधले. २०२० सालच्या निवडणुकीनंतर झालेल्या या हिंसाचाराला रोखण्यासाठी अमेरिकी लष्कराची काहीच तयारी नव्हती, असा दावा सदर अधिकार्‍यांनी आपल्या लेखात केला आहे.

अमेरिका अजूनही विभागलेलीच असून यापुढे अत्यंत भयावह परिस्थितीसाठी पावले उचलायला हवीत, असे माजी अधिकार्‍यांनी बजावले आहे. २०२४ सालच्या निवडणुकीनंतर अमेरिकेच्या लष्करातही अराजक माजू शकते व त्यामुळे अमेरिकी जनतेच्या जीवाला भयंकर धोका उत्पन्न होऊ शकतो, असा इशारा इटन, अँडरसन व तगुबा यांनी दिला. ‘अमेरिकेतील राजकारणाचे ध्रुवीकरण झाले असून लष्कराच्या निष्ठाही विभागल्या जाऊ शकतात. काही जण वैधतेने नियुक्त झालेल्या कमांडर इन चीफच्या आदेशांचे पालन करतील. मात्र इतरजण कदाचित पराभूत झालेल्या उमेदवाराचे आदेश ऐकण्याची शक्यता आहे’, अशी भीती माजी लष्करी अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी सदर लष्करी अधिकार्‍यांनी पराभूत उमेदवाराचा उल्लेख ‘ट्रम्पिअन लुझर’ असा केला आहे. लष्करात फूट पडल्यास अमेरिकेची सुरक्षाव्यवस्था लुळी पडेल व एखादा शत्रूदेश त्याचा फायदा उठवून हल्ला चढवू शकतो, असे लष्करी अधिकार्‍यांनी बजावले.

leave a reply