निर्वासितांच्या वाढत्या लोंढ्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ‘बॉर्डर वॉल’ची उभारणी सुरू

‘बॉर्डर वॉल’ची उभारणीवॉशिंग्टन – अमेरिकेत घुसखोरी करणार्‍या निर्वासितांची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालल्याचे समोर येत आहे. नोव्हेंबर महिन्यात जवळपास पावणेदोन लाख अवैध निर्वासितांनी अमेरिका-मेक्सिको सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती ‘कस्टम ऍण्ड बॉर्डर पॅट्रोल’ने दिली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत १० हजार अधिक निर्वासितांनी घुसखोरीचा प्रयत्न केला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अवैध निर्वासितांमध्ये तब्बल १४० टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढत्या घुसखोरीला रोखण्यासाठी टेक्सास प्रांताचे गव्हर्नर ग्रेग ऍबॉट यांनी ‘टेक्सास-मेक्सिको’ सीमेवर बॉर्डर वॉलची उभारणी सुरू केली.

ऑक्टोबर महिन्यात अमेरिकी यंत्रणेने अवैध घुसखोरी करताना पकडलेल्या निर्वासितांची आकडेवारी जाहीर केली होती. त्यात, १ ऑक्टोबर, २०२० ते ३० सप्टेंबर, २०२१ या कालावधीत तब्बल १७ लाखांहून अधिक निर्वासितांना बेकायदा घुसखोरी करताना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाने दीड लाख निर्वासितांना अमेरिकेत मोकळे सोडून दिल्याची धक्कादायक बाबही उघड झाली होती. या पार्श्‍वभूमीवर नवी आकडेवारी निर्वासितांच्या समस्येने गंभीर रुप धारण केल्याचे दर्शवित आहे.

‘बॉर्डर वॉल’ची उभारणी‘कस्टम ऍण्ड बॉर्डर पॅट्रोल’ने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात तब्बल एक लाख, ७३ हजारांहून अधिक निर्वासितांनी मेक्सिको सीमेतून घुसण्याचा प्रयत्न केला. ऑक्टोबर महिन्यात हीच संख्या एक लाख, ६४ हजार होती. तर गेल्या नोव्हेंबर महिन्यात ७२ हजार अवैध निर्वासितांची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यावर्षी अवैध निर्वासितांच्या घुसखोरीचे प्रमाण तब्बल १४० टक्के इतक्या प्रचंड प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. यामागे बायडेन प्रशासनाची बोटचेपी व सौम्य धोरणे कारणीभूत ठरल्याचे मानले जाते.

‘बॉर्डर वॉल’ची उभारणीबायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर एकापाठोपाठ बेकायदा निर्वासितांना मोकळीक देणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. ट्रम्प यांचे निर्वासितांसंदर्भातील धोरण अमेरिकेला काळिमा फासणारे होते असा ठपकाही बायडेन यांनी ठेवला होता. अमेरिकेत राहणार्‍या एक कोटींहून अधिक बेकायदा निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी नवे विधेयकही बायडेन प्रशासनाने संसदेत सादर केले होते. या धोरणांमुळे अमेरिका-मेक्सिको सीमेवर असलेल्या टेक्सास व फ्लोरिडा यासारख्या प्रांतांमध्ये आणीबाणीची परिस्थितीही निर्माण झाली होती. परिस्थिती अधिकाधिक बिघडत चालल्याने अमेरिकी जनतेतील नाराजीही वाढत असल्याचे समोर येत आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाती घेतलेला ‘मेक्सिको बॉर्डर वॉल’चा प्रकल्प बायडेन यांनी रोखून धरला होता. मात्र घुसखोरीचा सर्वाधिक फटका बसलेल्या टेक्सास प्रांताचे गव्हर्नर ग्रेग ऍबॉट यांनी पुन्हा या प्रकल्पाला सुरुवात केली आहे. टेक्सास-मेक्सिको सीमाभागात ‘बॉर्डर वॉल’ची उभारणी सुरू झाली असून त्यासाठी एक अब्ज डॉलर्सहून अधिक तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून १०० मैलांहून अधिक लांबीची बॉर्डर वॉल उभारण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

leave a reply