अमेरिकेच्या कार्गो विमानातून क्रूझ् क्षेपणास्त्राची चाचणी

कार्गोवॉशिंग्टन – अमेरिकेच्या हवाईदलाने ‘सी-१३०जे’ या मालवाहू विमानातून क्रूझ क्षेपणास्त्र ड्रॉप करण्याची यशस्वी चाचणी केली. मेक्सिकोच्या आखातात ही चाचणी पार पडली. अमेरिकन हवाईदलाच्या ‘रॅपिड ड्रॅगन’ मोहिमेअंतर्गत अशाप्रकारची ही पाचवी चाचणी ठरते. यामुळे युद्धकाळात अमेरिकेच्या हवाईदलातील शेकडो मालवाहू विमानांचा वापर सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या मोहिमांसाठी, तसेच हल्ल्यांसाठीही केला जाऊ शकतो, असे लष्करी विश्‍लेषक सुचवित आहेत. म्हणूनच अमेरिकेच्या हवाईदलासाठी ही महत्त्वाची घडामोड ठरते.

कार्गोगेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेची ‘एअर फोर्स रिसर्च लॅबोरेटरी-एएफआरएल’ मालवाहू विमानातून प्रक्षेपित किंवा ड्रॉप केल्या जातील, अशा ‘पॅलेटाईज् वेपन सिस्टिम’वर काम करीत आहे. अर्थात बॉक्समधून क्रूझ् क्षेपणास्त्र हल्ल्याच्या ठिकाणी प्रक्षेपित करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी हालचाली सुरू आहेत. याआधी अमेरिकेच्या हवाईदलाने लाईव्ह फायर चाचणी घेतली नव्हती. गेल्याच महिन्यात लांब पल्ल्याच्या क्रूझ् क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. पण या क्षेपणास्त्रात स्फोटके नव्हती.

कार्गोपण गेल्या आठवड्यात पार पडलेल्या चाचणीत अमेरिकेच्या हवाईदलाने विशेष लष्करी पथकसाठी वापरण्यात येणार्‍या ‘सी-१३०जे कमांडो टू’ विमानातून लाईव्ह फायर चाचणी केली. या क्षेपणास्त्राने अचूकरित्या लक्ष्य भेदल्याचे ‘एएफआरएल’ने जाहीर केले. या चाचणीमुळे अमेरिकी हवाईदलाच्या क्षमतेत वाढ होईल, असे ‘एएफआरएल’ने स्पष्ट केले. गेल्या कित्येक वर्षांपासून अमेरिकेच्या हवाईदलाच्या सेवेत असलेल्या मालवाहू विमानांचा वापर सामरिक मोहिमांसाठी केला जाऊ शकतो, असे संकेत एएफआरएलने दिले.

सी-१३० जे विमानांमधील यशस्वी चाचणीनंतर अमेरिकेचे हवाईदल ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ या मालवाहू विमानातूनही क्रूझ् क्षेपणास्त्रांची चाचणी घेणार आहे. पुढच्या वर्षी लाईव्ह फायरचा वापर करून पार पडेल, असे एएफआरएलने सांगितले. याशिवाय इतर मालवाहू विमानांमध्ये याचा वापर होईल का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण अमेरिकेचे हवाईदल आपल्या मालवाहू विमानांना भविष्यातील मोठ्या युद्धांसाठी तयार असल्याचा दावा अमेरिकेतील लष्करी विश्‍लेषक करीत आहेत.

अमेरिकेच्या हवाईदलात आठशेहून अधिक मालवाहू विमाने आहेत. यामध्ये ४०० हून अधिक सी-१३०जे श्रेणीतील विमानांचा समावेश आहे. तर २२३ सी-१७ ग्लोबमास्टर विमानांचा समावेश आहे. त्यामुळे अमेरिकेचे हवाईदल येत्या काळात किमान मालवाहू विमानांचे स्क्वाड्रन्स मोठ्या संख्येने क्रूझ् क्षेपणास्त्रांनी सज्ज करू शकते, असे दिसत आहे.

leave a reply