फ्रान्सकडून ‘इंडो-पॅसिफिक’साठी स्वतंत्र राजदूताची नियुक्ती

पॅरिस – दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र ‘इंडो-पॅसिफिक’ धोरण घोषित करणाऱ्या फ्रान्सने या क्षेत्रात अधिक सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी, इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी स्वतंत्र राजदूतांची घोषणा केली आहे. फ्रान्सच्या परराष्ट्र विभागातील वरिष्ठ अधिकारी ख्रिस्तोफ पेनॉ यांची राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात फ्रान्सने, इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनला रोखण्यासाठी सक्रिय झालेल्या ‘क्वाड’मध्ये सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे संकेत दिले होते.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र इंडो-पॅसिफिक धोरण जाहीर केले होते. त्यावेळी मॅक्रॉन यांनी, या क्षेत्रातील चीनच्या वर्चस्ववादाचा उघड उल्लेख करून त्याला शह देण्यासाठी फ्रान्स भारत व ऑस्ट्रेलियाबरोबर धोरणात्मक आघाडी करेल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतरच्या काळात फ्रान्सने भारत व ऑस्ट्रेलियाबरोबर सामरिक सहकार्य भक्कम करण्यासाठी वेगाने पावले उचलली होती. गेल्या वर्षी फ्रान्सने आपली युद्धनौकाही साऊथ चायना सीमध्ये धाडली होती. काही महिन्यांपूर्वी फ्रान्सने अमेरिकेच्या पुढाकाराने आयोजित होणाऱ्या ‘रिम ऑफ पॅसिफिक’ या व्यापक नौदल सरावातही सहभाग घेतला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर फ्रान्सने इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी स्वतंत्र राजदूताची नियुक्ती करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. ही नियुक्ती थेट फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून झाल्याची माहिती फ्रेंच सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे फ्रान्स इंडो-पॅसिफिकमध्ये अधिक सक्रिय होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राजदूत म्हणून परराष्ट्र विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून फ्रान्सने इंडो-पॅसिफिकमधील हालचाली आपण गांभीर्याने घेत असल्याचा संदेश दिल्याचे मानले जाते. नवे राजदूत ख्रिस्तोफ पेनॉ येत्या काही दिवसात सूत्रे स्वीकारणार असून, त्यापूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलियाचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे.

गेल्या वर्षभरात फ्रान्सने चीनच्या आक्रमक व विस्तारवादी कारवायांविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. साऊथ चायना सीमधील चीनच्या हालचालींसह उघुरवंशीय व हॉंगकॉंगच्या मुद्यांवर फ्रान्सने जोरदार टीका केली होती. कोरोनाच्या साथीवरूनही फ्रान्सने चीनला धारेवर धरून चौकशीच्या प्रस्तावाला समर्थनही दिले होते. त्याचवेळी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारताचे स्थान महत्त्वाचे असल्याचा उल्लेख करून, आपल्या इंडो-पॅसिफिक धोरणात भारताबरोबरील सहकार्य वाढविण्यावर भर असेल, अशी ग्वाहीदेखील फ्रान्सने दिली होती.

leave a reply