हवामान विभाग मलेरियाचा अंदाजही वर्तविणार

नवी दिल्ली – देशातील हवामामाबाबत भाकित वर्तविणारा हवामान विभाग यापुढे मोसमी पावसाच्या काळात मलेरियाच्या साथीबाबतही अंदाज वर्तविणार आहे. ‘पृथ्वी विज्ञान मंत्रालया’चे सचिव एम. राजीवन यांनी ही माहिती दिली आहे. यासाठी नागपूरमध्ये करण्यात आलेल्या संशोधनाचा वापर करण्यात येईल, असेही राजीवन यांनी स्पष्ट केले आहे.

हवामान विभाग मलेरियाचा अंदाजही वर्तविणारभारतीय विज्ञान अकादमीने ‘रिसेन्ट ॲडव्हान्सेस इन वेदर ॲण्ड क्लायमेट प्रेडिक्शन्स’ विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात एम. राजीवन बोलत होते. ‘हवामान विभागाने डासांच्या प्रादुर्भावातून होणाऱ्या साथीच्या आजारांचा अभ्यास सुरू केला आहे. त्यात साथीच्या आजाराचा मोसमी पाऊस आणि तापमानाशी काही संबंध आहे का, याविषयी संशोधन करण्यात आले. नागपूरहून मलेरियाबाबत मिळालेल्या माहितीचा वापर करण्यात आला. हीच पद्धत इतर ठिकाणीही वापरली जाऊ शकते. यामुळे मलेरियाच्या साथीचा उद्रेक कुठल्या ठिकाणी होऊ शकतो याचा अंदाज पुढील पावसाळ्यापासून वर्तविता येईल’, असा विश्वास राजीवन यांनी व्यक्त केला आहे. या तंत्राचा वापर डेंग्यू व कॉलरा या साथीच्या आजारांबाबतही करता येऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला.

हवामान विभाग मलेरियाचा अंदाजही वर्तविणारदेशात २००१ साली २८ लाख मलेरियाचे रूग्ण आढळले होते. २०१८ साली ही संख्या चार लाखांपर्यंत खाली आली आहे. देशात मलेरिया रूग्णांची संख्या घटताना दिसत आहे. पण देशातील पर्वतीय, वन्य,आदिवासी भागात मलेरियाचे प्रमाण अजूनही सर्वाधिक आहे. त्यामध्ये ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय, मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. यावेळी राजीवन यांनी, हवामान विभागातील इतर बाबींकडेही लक्ष वेधले.

हवामानविषयक अंदाजासाठी भारताने ‘हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग’चा (एचपीसी) वापर सुरू केला असून, सध्या त्याची क्षमता १० पेटाफ्लॉप्स आहे. ती ४० पेटाफ्लॉप्सपर्यंत वाढविण्यात येत असून, त्यामुळे हवामानाचा अंदाज अधिक अचूकपणे वर्तविता येईल, असे राजीवन म्हणाले. ‘एचपीसी’ तंत्रज्ञान वापरण्यात अमेरिका, जपान आणि ब्रिटन यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. हवामान विभागाने ‘नॅशनल मान्सून मिशन’ आणि ‘एचपीसी’वर आतापर्यंत एकूण ९९० कोटी रूपये खर्च केले आहेत.

leave a reply