तटरक्षक दलाने वर्षभरात १५०० कोटी रुपयांचा अवैध माल जप्त केला

नवी दिल्ली – देशाच्या सुमारे २० लाख चौरस किलोमीटर सागरी सीमा क्षेत्रात टेहळणी करण्याची जबाबदारी असलेल्या भारतीय तटरक्षक दलाने २०२० सालात १५०० कोटी रुपयांचा अवैध माल जप्त केला असून सुमारे ८० जणांना अटक केली आहे. तसेच १० परकीय मच्छिमार बोटी ताब्यात घेल्याची माहिमी तटरक्षक दलाने दिली आहे.

भारताच्या विशेष अर्थिक सागरी क्षेत्रात घुसखोरी करणार्‍या, तसेच येथे अवैधरित्या मच्छिमारी करण्यासह अवैध मालाची वाहतूक करणार्‍यांवर २०२० सालात तटरक्षकदलाने मोठी कारवाई केली आहे. कोरोनाकाळातही तटरक्षक दलाकडून बारकाईने टेहळणी सुरू होती. तसेच दरदिवशी तटरक्षक दलाची किमान ५० जहाजे १२ विमाने या सागरी आर्थिक क्षेत्रात टेहळणीसाठी तैनात ठेवण्यात येतात. जहाजांबरोबर टेहळणी विमानातून गस्त वाढविल्यामुळे या क्षेत्रात अवैध घुसखोरी व मालवाहतूकीवर लगाम घालण्यास मदत मिळत आहे, असे तटरक्षक दलाकडून सांगण्यात आले. तटरक्षक दल १ फेब्रुवारीला आपला ४५ वा स्थापना दिवस साजरा करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर २०२० सालात तटरक्षक दलाने बजाविलेल्या कामगिरीची माहिती, अधिकार्‍यांकडून जाहिर करण्यात आली.

यानुसार वर्षभरात देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रातून (ईईझेड) बेकायदा भारतीय क्षेत्रात मासेमारी करणार्‍या १० परदेशी बोटी तटरक्षकदलाने ताब्यात घेतल्या आहेत. तसेच ८० जणांना अटक केली असून १५०० कोटी रुपयांचा अवैध माल जप्त केला आहे. याखेरीज वादळ, खराब हवामान, तसेच इतर संकटात अडकलेल्या सहा हजार मच्छिमार बोटींना सुखरुप किनार्‍यापर्यंत पोहाचविले आहे. तसेच ४० हजार मच्छिमारांना वाचविल्याचे तटकरक्षक दलांच्या अधिकार्‍याने सांगितले. गेल्यावर्षी देशाच्या किनारपट्टी भागात एकूण ११ चक्रीवादळे धडकली होती. या नैसर्गिक संकटादरम्यान तटरक्षकदलाने ही कामगिरी केली आहे.

१९७८ साली तटरक्षकदलाची स्थापना झाली होती. त्यावेळी तटरक्षकदलाकडे सात जहाजे होती. तर सध्या तटरक्षक दलाच्या ताफ्यात १५६ जहाजे आणि ६२ विमाने आहेत. तटरक्षकदलाकडील हा ताफा २०२५ सालापर्यंत २०० जहाजे आणि ८० टेहळणी विमानांपर्यंत पोहोचेल, यादृष्टीने काम सुरू आहे, अशी माहिती अधिकार्‍याने दिली.

leave a reply