हॅकर्सनी अमेरिकी इंधनकंपनीकडून ५० लाख डॉलर्सची खंडणी उकळली

वॉशिंग्टन – अमेरिकेतील सर्वात मोठी इंधनवाहिनी कंपनी ‘कोलोनिअल पाईपलाईन’ने सायबरहल्ला चढविणार्‍या हॅकर्सना तब्बल ५० लाख डॉलसहून अधिक खंडणी दिली आहे. या इंधनवाहिनीवर गेल्या शुक्रवारी ‘रॅन्समवेअर’ प्रकारातील सायबरहल्ला चढविण्यात आला होता. या सायबरहल्ल्यानंतर कंपनीने आपली पाईपलाईन व इंधनपुरवठा पूर्णपणे बंद केला होता. हल्ल्यामागे रशियाशी संबंधित असणार्‍या ‘डार्कसाईड’ या हॅकर्सच्या गटाचा हात असल्याचे उघड झाले होते. या घटनेने अमेरिकेतील सरकारी तसेच खाजगी यंत्रणा तसेच कंपन्यांवर होणार्‍या ‘रॅन्समवेअर’ प्रकारातील सायबरहल्ल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

हॅकर्सनी अमेरिकी इंधनकंपनीकडून ५० लाख डॉलर्सची खंडणी उकळली‘ब्लूमबर्ग’ या अमेरिकेतील आघाडीच्या वेबसाईटने ‘कोलोनिअल’कडून ‘डार्कसाईड’ गटाला खंडणी देण्यात आल्याचे वृत्त दिले आहे. कंपनीकडून गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात, सर्व व्यवहार पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र त्यात खंडणीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. अमेरिकी प्रशासनातील अधिकार्‍यांनी खंडणी दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचे ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तात सांगण्यात आले.

सायबरसुरक्षेची जबाबदारी असणार्‍या राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार ऍन न्यूबर्गर यांनी एका मुलाखतीत, अमेरिकी प्रशासनाचा खंडणीच्या व्यवहारांना विरोध असल्याचे स्पष्ट केले. मात्र त्याचवेळी सायबरहल्ला झाल्यानंतर कंपनीची होणारी अडचणही आम्ही समजू शकतो, या शब्दात प्रशासन कंपन्यांवर दबाव टाकणार नसल्याचा खुलासाही केला. अमेरिकेच्या ऊर्जामंत्री जेनिफर ग्रॅनहोल्म यांनी, कोलोनिअलची घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगून, यापुढे ऊर्जा क्षेत्राच्या सायबरसुरक्षेसाठी अधिक गुंतवणूक करण्यावर भर द्यावा लागेल, असे बजावले आहे.

हॅकर्सनी अमेरिकी इंधनकंपनीकडून ५० लाख डॉलर्सची खंडणी उकळलीकोलोनिअलकडून खंडणी देण्यात आलेल्या ‘डार्कसाईड’ या गटाने गेल्या वर्षीपासून आपल्या कारवाया वाढविल्याचे समोर आले आहे. गेल्या नऊ महिन्यात या गटाने अमेरिका व युरोपमधील ८०हून अधिक कंपन्यांना ‘रॅन्समवेअर’ सायबरहल्ल्याच्या माध्यमातून लक्ष्य केले आहे. हा गट फक्त मोठ्या खाजगी कंपन्यांना लक्ष्य करीत असून सरकारी यंत्रणा, हॉस्पिटल्स व शिक्षणसंस्थांना टाळत असल्याचेही सांगण्यात येते. हे हॅकर्स रशियाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांचा रशियन राजवटीशी थेट संबंध असल्याचे पुरावे उघड झालेले नाहीत.

अमेरिकी कंपनीकडून खंडणी दिल्याचे वृत्त समोर येत असतानाच आयर्लंडमधील आरोग्ययंत्रणा तसेच जपानची बहुराष्ट्रीय कंपनी ‘तोशिबा’वरही सायबरहल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. आयर्लंडच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा सायबरहल्ला झाल्याची माहिती देण्यात आली असून कॉम्प्युटर नेटवर्क पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. सायबरहल्ला ‘रॅन्समवेअर’ प्रकारातीलच असून तपास सुरू आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर तोशिबा या कंपनीने आपल्या युरोपमधील कॉम्प्युटर नेटवर्कवर सायबरहल्ला झाल्याची माहिती दिली आहे. हा हल्ला अमेरिकी पाईपलाईनला लक्ष्य करणार्‍या ‘डार्कसाईड’ हॅकर्सनीच केल्याचे तोशिबाकडून सांगण्यात आले.

leave a reply