कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचे मिश्र डोस अधिक प्रभावी

-आयसीएमआर

कोव्हॅक्सिननवी दिल्ली – कोविशिल्ड-कोव्हॅक्सिन या लसींचे मिश्रण किंवा मॅचिंगचे (दोन वेगवेगळ्या लसीचे एक-एक डोस) चांगले परिणाम समोर येत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) म्हटले. कोरोनाचे वेगवेगळ्या व्हेरिएंटला तोंड देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोनाच्या या दोन्ही लस एकत्र केल्याचे चांगले परिणाम समोर आल्याने कोरोना विरोधातील लढ्यात त्याचा फायदा होईल असा विश्‍वास व्यक्त करण्यात येतो.

काही महिन्यापूर्वीच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या तज्ज्ञांच्या पॅनेलने कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींचे मिश्र डोसवर संशोधन करण्याची शिफारस केली होती. यानंतर झालेल्या संशोधनानुसार दोन लसीचे मिश्रण करणे हे सुरक्षित आहेच. याचबरोबर त्यांचे चांगले परिणाम समोर आले आहेत. संशोधनाचे निष्कर्ष अतिशय सकारात्मक आल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.

कोव्हॅक्सिनकोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे डोस दिल्याने कोरोना संसर्गाविरोधात काय परिणाम होतात यासाठी ९८ नागरिकांवर चाचणी करण्यात आली. या चाचण्यांमध्ये उत्तर प्रदेशमधील १८ नागरिकांचा समोवश आहे. या वर्षी मे महिन्यात उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात लसीकरणादरम्यान आरोग्य कर्मचार्‍यांच्या चुकीने काही नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस आणि दुसरा डोस हा कोव्हॅक्सिनचा देण्यात आला होता. त्यानंतर याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र या नागरिकांना त्यांचा फायदाच झाल्याचे समोर आले.

एखाद्या व्यक्तीला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे वेगवेगळे डोस दिले जाऊ शकतात का? याकरता चौथ्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचणीसाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेला परवानगी देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर ९८ पेक्षा अधिक नागरिकांवर हा प्रयोग करण्यात आला. मे ते जून महिन्यात या नागरिकांना डोस देण्यात आले. या नागरिकांना दोन वेगवेगळे डोस देण्यात आल्याने त्यांच्यावर दुष्परिणाम झाले नाही. मुख्य म्हणजे त्यांचे सकारात्मक परिणाम दिसून आले.

कोविशिल्ड लस यूके व्हेरिएंट आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचे सांगण्यात येते. तर कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस यूके व्हेरिएंटसह अन्य व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोविशिल्ड-कोव्हॅक्सिन या दोन्ही लसीचा एकत्रित वापर करण्यात आल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतील असा विश्‍वास व्यक्त करण्यात येईल.

leave a reply