आंतरराष्ट्रीय पातळीवरील बदलत्या परिस्थितीत भारताचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील आपल्या भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन, रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांच्यासह इतरही नेत्यांनी भारताचा उल्लेख केला. ही सर्वसाधारण बाब ठरत नाही. तर बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारताचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे, याचे संकेत यातून मिळत आहेत, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. ‘आजच्या काळात आपण जगाचा सेतू, जगाचा आवाज, वेगळा दृष्टीकोन आणि जगाचे वेगळे माध्यमही बनलो आहोत’, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारतीय पत्रकारांना सांगितले.

S. Jaishankar18 व्या शतकात जागतिक जीडीपीमधील भारताचा हिस्सा एक चतुर्थांश अर्थात 25 टक्के इतका होता. पण 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारत जगातील गरीब देशांपैकी एक बनला. वसाहतवाद्यांनी भारताला ही गरीबी बहाल केली होती. पण आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून मोठ्या अभिमानाने जगासमोर आला आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आमसभेतील आपल्या भाषणात म्हटले होते. या भाषणात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारताची दृष्टी आणि दिशा यांची माहिती देऊन दहशतवादासारख्या आव्हानावरील भारताची भूमिका स्पष्ट शब्दात मांडली.

युक्रेनच्या युद्धात भारत कुणाच्याही बाजूने नसून भारत शांततेच्या बाजूने उभा आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेमागील उद्दिष्टांवर भारत ठाम राहून आपली ही भूमिका मांडत असल्याचे जयशंकर यांनी ठासून सांगितले. युक्रेनच्या युद्धात भारत रशियाच्या बाजूने उभा असल्याचे आक्षेप घेणाऱ्यांना जयशंकर यांनी ही चपराक लगावली. त्याचवेळी दहशतवाद्यांवरील सुरक्षा परिषदेची कारवाई रोखणाऱ्या चीनचा थेट उल्लेख न करता जयशंकर यांनी जोरदार टीका केली. दहशतवादाचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येऊ शकत नाही. दहशतवाद्यांवर कारवाई रोखणाऱ्या देशांनी याबाबत पारदर्शक असले पाहिजे. दहशतवाद्यांचा बचाव करणे अखेरीस या देशांच्या हितसंबंधांसाठीच घातक ठरेल, असा इशारा यावेळी जयशंकर यांनी दिला.

साऱ्या जगाचे लक्ष युक्रेनकडे लागलेले असताना, भारत मात्र अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका या आपल्या शेजारी देशांकडे सावधपणे पाहत आहे.

हे देश संकटात सापडलेले असताना, भारत त्यांना आवश्यक ते सहाय्य करीत आहे, याकडे जयशंकर यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने एकाच देशाच्या संकुचित हितसंबंधांना अतिरेकी महत्त्व देण्याचे टाळून भारताच्या या कार्याकडेही लक्ष द्यावे, असे टोला परराष्ट्रमंत्र्यांनी लगावला. तसेच भारताने पुढच्या 25 वर्षात विकसित देश म्हणून उदयाला येण्याचे ध्येय स्वतःसमोर ठेवले आहे. यासाठी निर्धारित केलेले प्रगतीचे टप्पे भारत गाठत आहे, याची जाणीवही परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली.

यानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारतीय पत्रकारांशी बोलताना आमसभेबाबतचे आपले अनुभव मोकळेपणाने मांडले. आमसभेच्या निमित्ताने आपण शंभराहून अधिक देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली, याची माहिती यावेळी जयशंकर यांनी दिली. यावेळच्या आमसभेत कित्येक नेत्यांनी भारताचा उल्लेख केला, असे सांगून याला फार मोठे राजनैतिक महत्त्व असल्याचे जयशंकर यांनी लक्षात आणून दिले. कुठल्याही देशाचे नेते आमसभेतील आपल्या भाषणात सहसा दुसऱ्या देशाचा उल्लेख करीत नाहीत. पण यावेळी आमसभेतील आपल्या भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, रशियाचे परराष्ट्रमंत्री तसेच इतरही अनेक नेत्यांनी भारताचा उल्लेख केला. ही साधीसुधी बाब ठरत नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे महत्त्व वाढत असल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

जगाच्या ग्लोबल साऊथ अर्थात दक्षिणेचा आवाज म्हणून भारत पुढे येत आहे. तसेच जगाचे ध्रुवीकरण होत असताना अर्थात बड्या देशांमधील मतभेद विकोपाला जात असताना, भारताला मिळत असलेले हे महत्त्व लक्षणीय ठरते. यामुळे भारत जगाचा सेतू बनत असून आपल्यासह इतर विकसनशील देशांचा आवाज आणि दृष्टीकोन व वेगळे माध्यम म्हणून भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर उदयाला येत आहे, असा दावा परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

leave a reply