चीनला रोखण्यासाठी सशस्त्र सीमा बलाकडून भारत भूतान सीमेवर नव्या चौक्यांची उभारणी

नवी दिल्ली – डोकलामजवळील सीमाभागात चीनने पुन्हा लष्करी हालचाली सुरू केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. भारताने याची गंभीर दखल घेतल्याचे दिसत आहे. भारत-भूतान आणि चीनच्या सीमा भिडलेल्या या भागात भारताच्या ‘सशस्त्र सीमा बला’ने (एसएसबी) सुमारे २२ नव्या चौक्या उभारल्या आहेत. यामुळे भारताबरोबरच भूतानची सुरक्षा अधिक सुनिश्‍चित झाली आहे.

२०१७ साली डोकलाममधील भूतानच्या सीमाभागात घुसखोरी करू पाहणार्‍या चीनच्या जवानांना भारतीय लष्कराने रोखले होते. भूतानच्या हद्दीत शिरून बांधकाम करण्याचे चीनच्या लष्कराचे प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडले. यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष भडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. ७० दिवसांहून अधिक काळ भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर खडे ठाकले होते. अखेरीस चीनने इथून माघार घेतली व दोन्ही देशांमधील तणाव निवळला होता.

मात्र लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनचा तणाव वाढलेला असताना, चीनने पुन्हा डोकलामनजिकच्या आपल्या क्षेत्रात लष्करी हालचाली सुरू केल्याच्या बातम्या आल्या होत्या. भारत आणि भूतानमध्ये संरक्षणविषयक करार झालेला असून यानुसार भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारताने स्वीकारलेली आहे. त्यामुळे चीनच्या हालचालींवर नजर रोखलेल्या भारताने आपल्या सीमेबरोबरच भूतानच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेतल्याचे दिसत आहे.

यानुसार ‘एसएसबी’ने या सीमेवर आणखी २२ नव्या चौक्या उभारल्या आहेत. समुद्रसपाटीपासून सुमारे १२ हजार फुटांवर असलेल्या या क्षेत्रात ‘एसएसबी’ने सुमारे ७३४ चौक्या तयार करण्याचे ध्येय समोर ठेवले होते. यातील ७२२ चौक्यांचे काम पूर्ण झाले आहे व अवघ्या १२ चौक्यांचे काम अद्याप बाकी आहे. लवकरच या चौक्या देखील बांधून होतील, असे सांगितले जाते. पूर्ण झालेल्या २२ चौक्या विक्रमी वेळेत उभारल्या गेल्याची माहिती सशस्त्र सीमा बलाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. तसेच हिवाळ्यात लडाखप्रमाणे इथले तापमानही शुन्याच्या खाली घसरते. अशा स्थितीत हे चौक्यांचे बांधकाम झाले, याकडे ‘एसएसबी’च्या अधिकार्‍यांनी लक्ष वेधले आहे.

लडाखच्या सीमावर चीनबरोबर निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन ‘एसएसबी’ने इथल्या सीमेवरील सज्जता अधिकच वाढविली आहे. इथला एकही सैनिक कायदा व सुव्यवस्था राखण्यापासून इतर दुसर्‍या कुठल्याही सेवेसाठी तैनात करण्यात आलेला नाही, अशी माहिती ‘एसएसबी’च्या अधिकार्‍यांनी दिली. भारतावर दडपण वाढविण्यासाठी चीन पुन्हा एकदा डोकलामचा वाद छेडून इथे घुसखोरी करू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात होती. चीनच्या लष्कराने डोकलामनजिकच्या क्षेत्रात लष्करी हालचाली करून याबाबतचा संशय अधिकच वाढविला होता. मात्र याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने तयारी केली असल्याचे ‘एसएसबी’ने उभारलेल्या नव्या चौक्यांवरून उघड होत आहे.

leave a reply