पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर विरोधी पक्षाची घणाघाती टीका

इस्लामाबाद – पूर्वतयारी न करता आपण सत्तेवर आलो, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिले तीन महिने आपल्याला सारे काही समजून घेण्यातच गेले. आधीच्या काळात सरकारबाहेर असताना हे काही चित्र आपण पाहिले होते, ते तसे नसल्याचा अनुभव सरकारमध्ये आल्यानंतर मिळाला’, अशी धक्कादायक विधाने पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते यावर संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले असून यामुळे इम्रान खान यांच्यावरील टीका अधिकच तीव्र झाली आहे.

आपण नवशिके असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वतःहून मान्य केले. पण त्यांच्या नवशिकेपणाची फार मोठी किंमत पाकिस्तानची जनता चुकती करीत आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेत्या मरियम नवाझ यांनी इम्रान?खान यांच्यावर टीकेची झोड उठविली. तर इम्रान खान यांनी आपल्या नाकर्तेपणाची कबुली आपणहूनच दिली हे फार बरे झाले, असे विरोधी पक्षाच्या आघाडीचे नेते मौलाना फझलुर रेहमान यांनी म्हटले आहे. सध्या पाकिस्तानचे विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटले असून त्यांनी महागाई, बेरोजगारी आणि परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर इम्रान?खान यांना मिळत असलेल्या अपयशाचा मुद्दा उपस्थित करून सरकारला धारेवर धरले आहे.

पाकिस्तानात महागाईने उच्चांक गाठला असून पुढच्या काळात दर खाली येण्याची शक्यता नाही. नाणेनिधीकडून कर्ज घेण्यासाठी आपण फार उशीर केला व ही मोठी चूक ठरली, याचीही कबुली इम्रान खान यांनी दिलेली आहे. याचाही दाखला विरोधी पक्षांकडून दिला जातो. सरकारच्या अशाच चुकीच्या धोरणांचे भयंकर परिणाम समोर आले आहेत. विशेषतः सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात व चीनसारख्या मित्रदेशांना इम्रान खान यांच्या सरकारने दुखावले व यामुळे आज पाकिस्तानची जागतिक पातळीवर कोंडी झाल्याचे दिसत आहे, अशी घणाघाती टीका या देशाची माध्यमेही करू लागली आहेत.

leave a reply