नेपाळच्या राष्ट्रपतींकडून वादग्रस्त नकाशाला मंजुरी

Nepal-Mapनवी दिल्ली/काठमांडू – भारतीय भूभाग आपल्या क्षेत्रात दाखवणाऱ्या वादग्रस्त नकाशाला गुरुवारी नेपाळ संसदेच्या वरिष्ठ सभागृहातही मंजुरी मिळाली. त्यानंतर नेपाळच्या राष्ट्रपतींनीही या नकाशासंदर्भांतील विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या वादग्रस्त नकाशाला नेपाळमध्ये घटनात्मक दर्जा मिळाला आहे. नकाशात संसदेत मंजुरीसाठी सुरु असलेली प्रक्रिया नेपाळने थांबवावी, तर यामुळे सकारात्मक वातावरण तयात होईल, असा संदेश दोनच दिवसांपूर्वी भारताने नेपाळला दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत नेपाळने आपल्या वरिष्ठ सभागृहातूनही हा नकाशा मंजूर करून घेतला. नेपाळ चीनच्या पाठबळावर घेत असलेल्या एकतर्फी निर्णयांमुळे नेपाळबरोबर चर्चेची द्वारे बंद होत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

गेल्या महिन्यात नेपाळच्या मंत्रिमंडळाने या वादग्रस्त नकाशाला मंजुरी दिली होती. भारताने त्यावर आक्षेप नोंदविला होता. पण शनिवारी नेपाळ सरकारने संसदेच्या कनिष्ठ सभागृहात हे विधेयक मंजूर करून घेतले. नेपाळचा हा विस्तार कृत्रिम असून त्याला कोणताही पुरावा नसल्याचा टोला भारताने लगावला होता. तसेच चर्चेतून मार्ग काढता येईल, असे नेपाळला सांगितले होते. पण नेपाळकडून कोणताही सकारात्मक हालचाली होत नसल्याचे स्पष्ट होते. गुरुवारी आपल्या वरिष्ठ सभागृहातही नकाशा संदर्भांतील विधेयक मंजूर करून नेपाळने हेच दाखवून दिले आहे. लडाखमध्ये चीनने घुसखोरी केल्यावर नेपाळने हा वाद उकरून काढल्याने या दोन्ही घटनांना एकत्र जोडून पहिले जात आहे. चीनच्या सांगण्यावरूनच योजनाबद्धरित्या नेपाळ वाद वाढवीत असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Nepalदरम्यान नेपाळचे लष्कर प्रमुख पूर्णचंद्र थापा यांनी बुधवारी सीमा भागाचा दौरा केला. त्यांच्यासोबत नेपाळच्या सशस्त्र पोलिस दलाचे प्रमुख उपस्थित होते. नेपाळकडून भारतीय सीमेवर १०० नव्या चौक्या उभारण्यात येत आहेत. यातील काही चौक्या लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुराजवळ बांधल्या जात आहेत. याच भारतीय भूभाग नेपाळने आपल्या नकाशात समाविष्ट केले आहेत. यातल्या कालापानी भागात नेपाळचे लष्कर प्रमुख पूर्णचंद्र थापा यांनी भेट दिली.

यावेळी लष्कर प्रमुख पूर्णचंद्र थापा यांनी छांगरूमध्ये बांधण्यात आलेल्या चौकीची आणि भारताच्या सीमेलगतच्या दार्चुला जिल्ह्यातील व्यास गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली. नेपाळचा हा दार्चुला भाग उत्तराखंडच्या पिथौरागडमधल्या धारचुलाच्या जवळ आहे. नेपाळच्या लष्कर प्रमुख या भागात प्रथमच आले आहेत. कालापानीवरूनच भारत आणि नेपाळमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे नेपाळच्या लष्करप्रमुखांची ही भेट लक्ष वेधून घेत आहे.

leave a reply