जगभरातील कोरोनाच्या बळींची संख्या साडेचार लाखांवर

World-Coronavirusवॉशिंग्टन, दि. १८ – जगभरात कोरोनाचा साथीमुळे दगावणाऱ्यांची संख्या साडेचार लाखांवर गेली असून त्यात अमेरिकेतील सुमारे एक लाख २० हजार जणांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये जगभरात गेल्या दोन दिवसांत तीन लाखांहून अधिक रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ८४ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. लॅटिन अमेरिका, आशिया व आफ्रिका खंडात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर येत आहे.

कोरोना साथीचा उद्रेक अजूनही कमी झालेला नाही. दर दिवशी नवे देश ‘हॉटस्पॉट’ म्हणून समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसांत जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत ३,०७,७६१ जणांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या ८४,९१,६१४ झाल्याची माहिती ‘वर्ल्डओमीटर’ या वेबसाईटने दिली आहे. एकूण बळींची संख्या ४,५२,५४२ झाली असून गेल्या ४८ तासांत ११,३६२ जण दगावले आहेत. साथीतून बरे होणाऱ्यांची संख्या ४४,४८,७९४ झाली आहे.

गेले काही दिवस अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आलेख वाढताना दिसत असून एकूण रुग्णांची संख्या २२,४३,४०८ झाली आहे. दोन दिवसांत त्यात तब्बल ५३,०९३ जणांची भर पडली आहे. बळींची एकूण संख्या १,२०,०९५ वर गेल्याची माहिती वर्ल्डओमीटर वेबसाईटवर देण्यात आली आहे. गेल्या ४८ तासांत अमेरिकेत दीड हजारांहून अधिक नव्या बळींची नोंद झाली आहे.

World-Coronaब्राझिलमध्ये रुग्णांची संख्या ९,६०,३०९ झाली असून ४६ हजारांहून अधिक जण दगावले आहेत. ब्राझीलपाठोपाठ मेक्सिकोतील बळींची संख्या १९ हजारांवर गेली असून पेरू व चिली या दोन आघाडीच्या लॅटिन अमेरिकी देशांमध्ये बळींची संख्या १० हजारांवर गेल्याची माहिती देण्यात आली आहे. पेरू व चिलीतील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांहून अधिक असून मेक्सिकोत दीड लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

आशिया खंडातील बांगलादेशमध्ये कोरोना रुग्णांनी एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांहून अधिक नोंदविणारा तो जगातील १७ वा देश ठरला आहे. इंडोनेशियात २४ तासांमध्ये १,३३१ नवे रुग्ण आढळले असून इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडण्याची पहिलीच वेळ असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. आफ्रिका खंडातील रुग्णांची संख्या २,६८,६६२ झाली असून ७,२२१ जण दगावले आहेत.

leave a reply