सागरी हद्दीबाबतचा करार झाला तरी लेबेनॉन व इस्रायलमध्ये सहकार्य प्रस्थापित होणार नाही

लेबेनॉनच्या मावळत्या राष्ट्राध्यक्षांचा दावा

बैरूत – इंधनसंपन्न असलेल्या भूमध्य सागरी क्षेत्राच्या मालकीवरून इस्रायल व लेबेनॉमधील वाद मिटविणारा करार गुरुवारी संपन्न झाला. दोन्ही देशांसह अमेरिकेने या करारावर समाधान व्यक्त केले. कट्टर इस्रायलद्वेष्टी संघटना असलेल्या हिजबुल्लाहच्या प्रमुखानेही हा करार म्हणजे लेबनीज जनतेचा विजय असल्याचा दावा केला. तर या करारासाठी मध्यस्थी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांनी याची तुलना इस्रायल व अरब देशांमध्ये झालेल्या अब्राहम कराराशी केली होती. पण लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष मिशेल एऑन यांनी इस्रायलबरोबर शांतीकराराचा प्रश्नच उद्भवत नाही, असे जाहीर करून ही शक्यता निकालात काढली आहे.

Cooperation between Lebanon and Israelअरब आखाती देशांनी इस्रायलबरोबर अब्राहम करार करून या देशाला मान्यता दिली व राजकीय तसेच आर्थिक सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलली होती. याचे फार मोठे लाभ इस्रायलला मिळू लागले आहेत. अशा परिस्थितीत भूमध्य समुद्रातील सागरी क्षेत्राबाबत लेबेनॉनशी सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी दोन दिवसांपूर्वी संपन्न झालेला करार म्हणजे नवा अब्राहम करार असल्याचे दावे करण्यात येत होते. इस्रायलच्या सरकारला हा करार करण्यात आलेली यश म्हणजे फार मोठी बाब असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. लवकरच लेबेनॉनसारखा इस्रायलविरोधी देश देखील इस्रायलविरोध मागे टाकून सहकार्य करू शकतो, असा दावा काही बातम्यांमध्ये करण्यात आला होता. पण लेबेनॉनचे मावळते राष्ट्राध्यक्ष एऑन यांनी हा दावा फेटाळला आहे.

राष्ट्राध्यक्ष एऑन यांचा कार्यकाळ संपत आला आहे. मात्र आपला उत्तराधिकारी अजूनही घोषित झालेला नाही, असे सांगून यावरून सुरू असलेल्या वादामुळे लेबेनॉनमध्ये राजकीय अस्थैर्य माजेल, अशी चिंता एऑन यांनी व्यक्त केली आहे. अशा स्थितीत आपल्या सरकारने इस्रायलबरोबर भूमध्य सागरी क्षेत्रातील हद्दीबाबत करार करून युद्ध टाळल्याची माहिती एऑन यांनी दिली. तसेच लेबेनॉन या कराराशी बांधिल असेल, असेही राष्ट्राध्यक्ष एऑन पुढे म्हणाले. मात्र याचा अर्थ लेबेनॉनने इस्रायलबरोबर शांतीकरार केलेला आहे, असा होत नाही. इस्रायलबरोबर शांती प्रस्थापित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगून एऑन यांनी सध्या तरी तशी शक्यता समोर नसल्याचे संकेत दिले.

दरम्यान, हिजबुल्लाह या लेबेनॉनवर वर्चस्व गाजविणाऱ्या कट्टरपंथिय संघटनेने देखील इस्रायलबरोबरील सदर कराराला पाठिंबा दिला. या करारानंतर इस्रायलच्या विरोधात दिलेला अर्लट मागे घेऊन हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाने सर्वांना धक्का दिला. हा करार लेबनीज जनतेच्या हिताचा असून सदर करारामुळे लेबनीज जनतेचा विजय झाला आहे, असे नसरल्ला याने म्हटले आहे. त्यामुळे सध्या तरी इस्रायलच्या लेबेनॉनबरोबरील या कराराला धोका संभवत नाही, असे दिसू लागले आहे. मात्र लेबेनॉनमधील राजकीय अस्थैर्य माजण्याबाबत राष्ट्राध्यक्ष एऑन यांनी दिलेला इशारा इस्रायलच्या चिंता वाढविणारी बाब ठरू शकते.

leave a reply