इराणमध्ये अराजक माजविण्याचे अमेरिका, ब्रिटन, इस्रायल व सौदीचे कारस्थान

इराणच्या आयआरजीसीच्या प्रमुखांचा आरोप

chaos-in-Iranतेहरान – हा इराणमधील दंगलीचा अखेरचा दिवस आहे. यानंतर कुणीही रस्त्यावर उतरू नये. अन्यथा कठोर कारवाईचा सामना करावा लागेल, अशी धमकी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्‌‍ कॉर्प्सचे (आयआरजीसी) मेजर जनरल हुसैन सलामी यांनी दिली. इराणमधील निदर्शनांमागे अमेरिका, ब्रिटन, इस्रायल आणि सौदीचे राजघराणे असल्याचे पुरावे सापडले सापडल्याचा दावा इराणने केला आहे. त्यानंतर मेजर जनरल हुसैन सलामी यांनी आत्ता तरी इराणच्या दंगेखोरांनी डोळे उघडावे, असा इशारा देऊन रस्त्यावर न उतरण्याची ताकीद दिली.

इराणच्या गुप्तचर विभाग आणि आयआरजीसीने निवेदन प्रसिद्ध करून इराणमधील निदर्शनांमागे अमेरिकेची सीआयए व ब्रिटन व इस्रायलचा हात असून यामागे सौदी अरेबियाचेही कारस्थान असल्याचा ठपका ठेवला. याचे सज्जड पुरावे हाती लागलेले आहेत, असा दावा सदर निवेदनात करण्यात आला. अराजक माजविण्याच्या आधी, अराजक सुरू झाल्यानंतर आणि त्यानंतरच्या परिस्थितीत काय करायचे, याच्या सूचना असलेली कागदपत्रे इराणच्या गुप्तचर विभागाला मिळालेली आहेत. अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएने हे सारे कारस्थान आखले होते. त्याला ब्रिटन व इस्रायलच्या गुप्तचर संघटनांनी साथ दिली. तसेच सौदीच्या राजघरण्याचाही हात इराणमधील निदर्शनांमागे आहे, असा आरोप करून मेजर जनरल सलामी यांनी सौदीला याची किंमत चुकती करावी लागेल, असे धमकावले.

chaos in Iranमहसा अमिनी या 22 वर्षाच्या तरुणीने हिजाबसक्तीला विरोध केल्यानंतर इराणच्या यंत्रणांनी तिला ताब्यात घेतले होते आणि पोलिसांच्या मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत होता. महसाच्या मृत्यूनंतर इराणमधील हिजाबविरोधी आंदोलन पेटले होते. पण महसाचा मृत्यू यंत्रणेच्या जवानांनी केलेल्या मारहाणीत नाही, तर आधीपासूनच प्रकृती खालावलेली असल्याने झाल्याचा खुलासा इराणच्या यंत्रणा देत आहेत. तर इराणच्या गुप्तचर विभाग व आयआरजीसीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, महसा अमिनीचा मृत्यू होण्यापूर्वीच इराणमधील निदर्शनांची तयारी करण्यात आली होती, असा ठपका ठेवला आहे.

इतकेच नाही तर इराणच्या विरोधात अमेरिका, ब्रिटन व इस्रायलने प्रचारयुद्ध छेडले असून आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये इराणविरोधात बातम्या दिल्या जात आहेत. सोशल मीडियाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनीही आपली धोरणे गुंडाळून इराणच्या राजवटीवर टीका करणाऱ्या बनावट खात्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना आपला प्लॅटफॉर्म वापरू दिला. यामागे इराणच्या विरोधात आखण्यात आलेले कटकारस्थान आहे. मात्र इतके सारे करूनही इराणविरोधात कारस्थाने आखणाऱ्या या देशांना आपले हेतू साध्य करता आलेले नाहीत. इराणच्या यंत्रणांनी त्यांचे डाव उधळून टाकलेले आहेत, असा दावा सदर निवेदनात करण्यात आला आहे.

देशाच्या विरोधात आखलेले हे कारस्थान लक्षात घेऊन निदान आत्ता तरी इराणमधील दंगेखोरांनी सत्य समजून घ्यावे, असे मेजर जनरल हुसैन सलामी म्हणाले. यानंतरही दंगेखोर रस्त्यावर उतरले तर मात्र दंगेखोरांची गय केली जाणार नाही, असा इशाराच मेजर जनरल सलामी यांनी दिला. याआधी 17 ऑक्टोबर रोजी मेजर जनरल सलामी यांनी सौदी अरेबियाची राजवट इराणमध्ये दंगे पेटवित असल्याचा आरोप केला होता. याची किंमत सौदीच्या राजवटीला चुकवावी लागेल, असे बजावून मेजर जनरल सलामी यांनी इराण याला प्रत्युत्तर देईल, असे बजावले होते. सौदीच्या राजवटीने आपल्या इराणविरोधी कारवाया रोखाव्या, अन्यथा सौदीलाच याच्या भीषण परिणांमाचा सामना करावा लागेल, असे मेजर जनरल सलामी यांनी धमकावले होते.

leave a reply