सौदी व इस्रायलमधील सहकार्याचा आखाती क्षेत्राला प्रचंड फायदा होईल

- सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल

रियाध – ‘सौदी आणि इस्रायलमध्ये सहकार्य प्रस्थापित झाले तर सर्वाधिक लाभ आखाती क्षेत्राला मिळेल. आर्थिक, सामाजिक आणि सुरक्षा या सर्वच पातळ्यांवर इस्रायलबरोबरचे सहकार्य आखाती क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल’, असा दावा सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान यांनी केला. पण हे सहकार्य प्रस्थापित होण्याआधी इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील शांतीप्रक्रिया मार्गी लागणे आवश्यक आहे, असे सांगून सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या आघाडीवर सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांनी नुकतीच अमेरिकेच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीला मुलाखती दिली. युएई आणि बाहरिन यांच्याप्रमाणे येत्या काळात सौदी देखील इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित करणार का, असा प्रश्‍न या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांनी सौदीची भूमिका स्पष्ट केली.

‘इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासंबंधीच्या हालचाली याआधीही सुरू होत्या. २००२ साली अरब शांतीयोजनेअंतर्गत तसा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तर त्याहीआधी १९८२ साली सौदीच्या राजवटीने प्रस्तावित केलेल्या फेझ योजनेतही इस्रायलबरोबर पूर्ण सहकार्य प्रस्थापित करण्याचे सुचविण्यात आले होते. पॅलेस्टाईनचा मुद्दा सोडविल्यानंतर हे सहकार्य प्रस्थापित झाले असते’, असे प्रिन्स फैझल म्हणाले.

आत्ता देखील १९६७ सालपूर्वीच्या पॅलेस्टाईनच्या सीमारेषा आणि त्यांच्या अधिकारांना मान्यता मिळाली तर सौदी व इस्रायलमध्ये सहकार्य प्रस्थापित होईल, असे सौदीचे परराष्ट्रमंत्री म्हणाले. ‘असे झाले तर आखाती क्षेत्र अधिक सुरक्षित आणि समृद्ध होईल व यासाठी इस्रायल देखील सहाय्यक ठरेल’, अशी प्रतिक्रिया प्रिन्स फैझल यांनी दिली. इतकेच नाही तर इस्रायल-पॅलेस्टाईन शांतीप्रक्रिया यशस्वी ठरली तर इस्रायल आणि सौदीमध्ये विमानसेवा सुरू होईल व इस्रायली नागरिकांना सौदीमध्ये प्रवेश दिला जाईल, असेही प्रिन्स फैझल यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युएई व बाहरिन या आखाती देशांनी इस्रायलबरोबर ‘अब्राहम करार’ केला होता. त्यावेळी सौदीने या सहकार्याचे स्वागत केले होते. पण पॅलेस्टाईनचा मुद्दा मार्गी लागल्यानंतरच सौदी व इस्रायलमध्ये सहकार्य प्रस्थापित

होऊ शकते, अशी भूमिका सौदीने घेतली होती. फेब्रुवारी महिन्यातही अरब लीगच्या बैठकीत परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांनी पॅलेस्टाईनचा मुद्दा उपस्थित केला होता.

दरम्यान, पॅलेस्टाईनचा प्रश्‍न सुटल्याशिवाय इस्रायलबरोबर कुठल्याही प्रकारचे सहकार्य प्रस्थापित होणार नाही, अशी सौदीची अधिकृत भूमिका आहे. प्रिन्स फैझल यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलतानाही आपल्या देशाची ही भूमिका मांडली. पण इराणच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, इस्रायल आणि सौदीमध्ये छुपे सहकार्य असल्याचेही याआधी उघड झाले आहे. अमेरिका, ब्रिटन येथील बैठकींमध्य इस्रायल व सौदीच्या अधिकार्‍यांच्या भेटी झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सौदीच्या निओम शहरात क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतल्याची बातमी अमेरिकी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली होती. सौदीने हे वृत्त फेटाळले असले तरी इस्रायली नेत्यांनी देखील सदर वृत्ताला दुजोरा दिला होता.

leave a reply