देशात रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीच्या वापराला तज्ज्ञ समितीची मंजुरी

नवी दिल्ली – भारतात कोरोनाच्या तिसर्‍या लसीला आपत्कालीन वापरासाठी ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (सीडीएससीओ) तज्ज्ञांच्या समितीने मंजुरी दिली आहे. रशियाने विकसित केलेल्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीला ‘सीडीएससीओ’ने मान्यता दिल्यावर लवकरच ‘द ड्रग्ज् कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) सुद्धा तज्ज्ञ समितीच्या शिफारसीच्या आधारावर या लसीच्या वापराला परवानगी देईल, अशी शक्यता आहे. त्यानंतर या लसीचा वापर सुरू होईल. देशात सध्या ‘ऑक्सङ्गर्ड-एस्ट्राजेनेका’च्या ‘कोविशिल्ड’ आणि ‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना परवानगी आहे. तिसरी लस उपलब्ध झाल्यानंतर देशात लसीकरणाचा वेग वाढेल, असा दावा केला जातो. तसेच ऑगस्टपर्यंत आणखी सहा लसी चाचण्यानंतर वापरासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

भारतात जानेवारीच्या सुरुवातीला ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना डीसीजीआयने तज्ज्ञ समितीच्य अहवालानंतर परवानगी दिली होती. त्यानंतर १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरूवात झाली. सध्या देशात १० कोटीहून अधिक जणांचे लसीकरण झाले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात डॉक्टर्स आणि फ्रन्टलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू करण्यात आले होते, तर त्यानंतर ६० वर्षारील जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील सर्वांना लसीकरण देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र या लसीकरण कार्यक्रमादरम्यान काही राज्यांनी आपल्याला लसी कमी पडत असून तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या व काही लसीकरण केंद्र बंद केली होती.

या पार्श्‍वभूमीवर आता रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही सुद्धा वापरासाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी रशियाने भारतीय कंपनी डॉ. रेड्डीज लॅबबरोबर करार केला होता. भारतात डॉ. रेड्डीजकडून या लसीने उत्पादन घेतले जाणार असून यासाठी चाचण्या सुरू होत्या. स्पुटनिक आणि डॉ.रेड्डीज लॅबकडून सादर करण्यात आलेल्या ट्रायल डाटाच्या आधारावर ‘सीडीएससीओ’च्या तज्ज्ञ समितीने या लसीला वापरासाठी परवानगी द्यावी अशी शिफारस ‘डीसीजीआय’कडे केली आहे. त्यामुळे लवकरच ‘डीसीजीआय’कडून या लसीला मंजुरी मिळेल व या लसीचा भारतात वापर सुरू होईल. यासंदर्भात सरकार कधीही घोषणा करेल, अशा बातम्या आहेत.

यामुळे देशात जास्त प्रमाणात लसी उपलब्ध होतील आणि लसीकरणाची व्याप्ती वाढविता येईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. देशात इतरही कंपन्या लस बनवित असून जॉन्सन ऍण्ड जॉन्सन या कंपनीनेही भारतात आपल्या लसीसाठी परवानगी मागितली आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑगस्टपर्यंत आणखी सहा कंपन्यांच्या कोरोनावरील लसी वापरासाठी उपलब्ध होतील, असा अंदाज आहे.

leave a reply