कोरोनाच्या ‘बी.१.६१७’ स्ट्रेनला भारतीय व्हेरियंट म्हणणे निराधार – केंंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बजावले

नवी दिल्ली – कोरोनाचा ‘बी.१.६१७’ या डबल म्युटेशन स्ट्रेनचा उल्लेख सातत्याने भारतीय स्ट्रेन किंवा भारतीय व्हेरियंट असा करण्यात येत आहे. अलिकडेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या काही वृत्त अहवालांमध्ये जागतीक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘बी.१.६१७’ हा भारतीय स्ट्रेन जागतिक चिंतेचा विषय असल्याचे म्हटल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात ‘डब्ल्यूएचओ’च्या अहवालात कुठेही ‘बी.१.६१७’ हा कोरोना प्रकार भारतीय असल्याचा उल्लेख नाही, याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लक्ष वेधले आहे. त्यामुळे कोरोनाच्या या स्ट्रेनला भारतीय स्ट्रेन म्हणणे चुकीचे व संपूर्णपणे निराधार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

‘बी.१.६१७’, डबल म्युटेशन, भारतीय व्हेरियंट, स्ट्रेन, संक्रमित, भारत, डब्ल्यूएचओभारतात कोरोनाचा ‘बी.१.६१७’ डबल म्युटेशन स्ट्रेन सर्वाधिक जणांना संक्रमित करीत आहे. या स्ट्रेनमुळेच भारतात कोरोनाची नवी लाट आल्याचे दावे केले जात आहेत. विविध राज्यांमधून जिनोम विश्‍लेषणासाठी आलेल्या नमुन्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर याच व्हेरियंटचे नमूने आढळत आहेत. नुकतेच ‘डब्ल्यूएचओ’ने दर आठवड्याला प्रसिद्ध करीत असलेल्या परिपत्रकात ‘बी.१.६१७’ या कोरोनाच्या प्रकाराला जागतिक चिंतेचा विषय ठरविले होते. या ३२ पानी अहवालात कोरोनाचा हा व्हेरियंट आतापर्यंत ४४ देशांमध्ये पसरल्याचा दावा करण्यात आला होता. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा हा म्यूटेंट स्ट्रेन पहिल्यांदा सापडला होता, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र ‘डब्ल्यूएचओ’चा दाखला देत सर्वच जण कोरोनाच्या या स्ट्रेनचा उल्लेख भारतीय स्ट्रेन म्हणून करीत आहेत. ‘डब्ल्यूएचओ’ने भारतीय स्ट्रेन जगासाठी मोठा चिंतेचा विषय असल्याचा दावा केल्याचे काही वृत्तांमधून दावे करण्यात आले होते. प्रत्यक्षात ‘डब्ल्यूएचओ’ने कुठेही या अहवालात ‘बी.१.६१७’चा उल्लेख भारतीय स्ट्रेन असा केलेला नाही. त्यामुळे या शब्दाचा वापर होता कामा नये. ‘डब्ल्यूएचओ’ने कुठेही कोरोनाचा हा प्रकार भारतीय असल्याचे म्हटलेले नसल्याने त्याचा असा उल्लेख करणे निराधार आहे. ही बाब सत्यावर आधारलेली नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट बजावले आहे.

दरम्यान, २०१९ साला चीनमध्ये पहिल्यांदा कोरोनाचा उद्रेक झाला. हा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आला. मात्र एका अपघातामुळे हा कोरोना विषाणू तेथे पसरला असे अहवाल आले होते. त्यानंतर या विषाणूचा उल्लेख सर्वत्र वुहान व्हायरस असाच करण्यात येत होता. चीनने यावर आक्षेप घेतले होते. कोणत्याही साथीला एका देशाशी जाडू नये असा तर्क देताना त्याला एखाद्या वैज्ञानिक नावाने संबोधण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर डब्ल्यूएचओने सार्स-कोविड-२ असा असे नाव या विषाणूला दिले होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अखेरपर्यंत याचा उल्लेख चिनी विषाणू असाच करीत होतेे. तसेच नुकतेच अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधून प्रसिद्ध झालेल्या अहवालांमध्ये हा विषाणू चीनने युद्धात वापरण्यासाठी तयार केल्याचा दावा केला होता. असे असताना कोरोनाला कुठेही आता वुहान व्हायरस किंवा चिनी विषाणू म्हणून जगभरात उल्लेख होताना दिसत नाही. मात्र ‘बी.१.६१७’ या कोरोनाच्या उपप्रकाराला भारतीय व्हेरियंट म्हणून उल्लेख होताना दिसत आहे. एकप्रकारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अप्रत्यक्षरित्या यावरच ताशेरे ओढल्याचे दिसत आहे.

दरम्यान, बुधवारी महाराष्ट्रात ८१६ जणांचा कोरोनाने बळी गेला, तर ४६ हजार ७८१ नव्या रुग्णांची नोंद झाली. उत्तर प्रदेशात १८ हजार नवे रुग्ण सापडले, तर ३२९ जण दगावले. कर्नाटकात एका दिवसात ५१७ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ४० हजार नवे रुग्ण सापडले. दिल्लीत ३०० जणांचा बळी गेला आणि १३ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या विविध राज्यात कोरोनाचे रुग्णांमध्ये बर्‍या होणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच काही राज्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी रुग्ण आढळत आहेत. मात्र मृत्युची संख्या वाढल्याचे पहायला मिळत आहे. बुधवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात ४ हजार २०५ रुग्ण दगावले. हा एका दिवसात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा नवा उच्चांक ठरला.

leave a reply