‘आयएस’च्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटशी पाकिस्तानी दहशतवादी जोडलेले आहेत

- संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा आरोप

संयुक्त राष्ट्रसंघ – ‘आयएसआयस’ ही इतर दहशतवादी संघटनांसारखी नसून हे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट असल्याचे भारताने बजावले आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे उपराजदूत आर. रविंद्र यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत हा इशारा दिला. आयएसआयएस किंवा आयएसआयएल अथवा आयएस अशा नावांनी ओळखल्या जाणार्‍या या खरतनाक संघटनेशी जगभरातील दहशतवादी गट जोडलेले आहेत. त्यामध्ये भारताच्या शेजारी देशांमधील दहशतवादी गटांचाही समावेश आहे, असे रविंद्र यांनी स्पष्ट केले. थेट नामोल्लेख न करता पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘आयएस’शी जोडलेल्या आहेत, याकडे रविंद्र यांनी लक्ष वेधले.

‘आयएस’च्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटशी पाकिस्तानी दहशतवादी जोडलेले आहेत - संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा आरोप‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करणार्‍या संयुक्त राष्ट्रसंघाच्या यंत्रणेसमोर बोलताना रविंद्र यांनी भारताची भूमिका मांडली. इराक व सिरिया या देशांमध्ये ‘आयएस’ची स्थापना झाली. योजनाबद्धरित्या हत्याकांड, छळवणूक, लैंगिक अत्याचार, गुलामगिरी आणि अपहरण हे भयंकर गुन्हे घडवून आणलेले आहेत. म्हणूनच इतर क्षेत्रिय दहशतवादी संघटनांप्रमाणे आयएसकडे पाहता येणार नाही. तर ते जागतिक पातळीवरील दहशतवाद्यांचे सिंडिकेट आहे. याच्याशी जगभरातील दहशतवादी गट जोडले गेले आहेत, असे रविंद्र म्हणाले. पाकिस्तान हा देश म्हणजे जागतिक दहशतवादाचे केंद्र असल्याचा आरोप भारताने वेळोवेळी केला होता. ‘आयएस’शी पाकिस्तानातील दहशतवादी गट जोडलेले आहेत, असेही रविंद्र यांनी पाकिस्तानचा थेट नामोल्लेख टाळून स्पष्ट केले.

भयंकर अमानवी कारवाया करणार्‍या दहशतवाद्यांना पाठिशी घालणार्‍या देशांना यासाठी जबाबदार धरल्याखेरीज, दहशतवाद्यांच्या विरोधातील आपल्या संघटीत लढ्याची विश्‍वासार्हताच प्रस्थापित होणार नाही, असे रविंद्र पुढे म्हणाले. इथेही पाकिस्तानचे नाव न घेता रविंद्र यांनी हा देश दहशतवादाची पाठराखण करीत आला व त्यावर अद्याप कठोर कारवाई झालेली नाही, ही बाब लक्षात आणून दिली. हे दहशतवादी ज्या देशातून आले आहेत, त्याच देशांनी त्यांना या कारवायांची कठोर शिक्षा देणे अपेक्षित आहे, असा टोला लगावून पाकिस्तानने तशी जबाबदारी कधीही स्वीकारली नव्हती, असे संकेत रविंद्र यांच्या भाषणातून मिळत आहेत.

‘आयएस’च्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटशी पाकिस्तानी दहशतवादी जोडलेले आहेत - संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा आरोपदरम्यान, अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेत असताना, तालिबानसारखी संघटना पुन्हा एकदा अफगाणिस्तानचा ताबा घेण्यासाठी पुढे सरसावत आहे. अफगाणिस्तानचे सरकार व लष्कर तालिबानशी संघर्ष करून आपला देश वाचविण्याचा प्रयत्न करील. पण सारी शक्ती पणाला लावून देखील स्वतःच्या बळावर अफगाणी लष्कर तालिबानला फार काळ रोखू शकणार नाही, अशी चिंता व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत तालिबानकडे अफगाणिस्तानचा ताबा आलाच, तर पुन्हा हा देश दहशतवादी संघटनांचे नवे केंद्र बनेल. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना याचा पुरेपूर लाभ घेतील व भारत आणि इतर देशांमध्ये घातपात माजविण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करतील, अशी चिंता अमेरिकन गुप्तचर विभागाच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे दहशतवादाचा मुद्दा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चर्चेचा विषय बनला आहे.

अशा परिस्थितीत अफगाणिस्तानातील दहशतवादाचे केंद्र पाकिस्तानात असून जागतिक पातळीवरील दहशतवादाचे धागेदोरेही पाकिस्तानशी जोडलेले आहेत, याची जाणीव भारत जगाला करून देत आहे. त्याचवेळी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत, याकडेही भारत सातत्याने लक्ष वेधत आहे. भारताच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिसाद मिळू लागला असून आता युरोपिय देश देखील भारताचे म्हणणे मान्य करू लागले आहेत.

leave a reply