‘कोपनहेगन डेमोक्रसी समिट’मधील तैवानच्या उपस्थितीने चीनचा जळफळाट

कोपनहेगन/बीजिंग – युरोपमधील कोपनहेगन शहरात पार पडलेल्या ‘डेमोक्रसी समिट २०२१’मधील तैवानी राष्ट्राध्यक्षांची उपस्थिती चीनला चांगलीच झोंबली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सदर परिषद म्हणजे फक्त राजकीय फार्स असल्याची आगपाखड केली. तर चीनमधील माध्यमे तसेच विश्‍लेषकांनी युरोपमधील परिषद म्हणजे पराभूतांच्या आघाडीसाठी तयार केलेले व्यासपीठ होते, अशी संभावना केली आहे. तैवानचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्वतंत्र स्थान संपविण्यासाठी चीनच्या राजवटीकडून सातत्याने आक्रमक प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याला फारसे यश मिळत नसून, उलट गेल्या वर्षभरात जागतिक पातळीवर तैवानला मिळणारे समर्थन वाढताना दिसत आहे.

‘कोपनहेगन डेमोक्रसी समिट’डेन्मार्कचे माजी पंतप्रधान अँडर्स फॉग रासमुसेन यांनी स्थापन केलेल्या ‘अलायन्स ऑफ डेमोक्रसीज्’ या संस्थेकडून २०१८ सालापासून डेमोक्रसी समिटचे आयोजन करण्यात येते. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत, प्रमुख वक्त्यांमध्ये तैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई इंग-वेन’ यांचा समावेश होता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झालेल्या ‘त्साई इंग-वेन’ यांनी ‘सिक्युरिंग डेमोक्रसी-तैवान्स एक्सपिरिअन्स’ या विषयावर आपली भूमिका मांडली.

‘कोपनहेगन डेमोक्रसी समिट’चीनचा नामोल्लेख न करता एकाधिकारशाही राजवट व वर्चस्ववादी धोरणांवर टीकास्त्र सोडून, जगभरातील लोकशाहीवादी देशांनी यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे तैवानी राष्ट्राध्यक्षांनी बजावले. स्वातंत्र्य, कायद्याचे पालन, मानवाधिकार या मुद्यांवरील आघाडी मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ‘एकाधिकारशाहीचा वापर करणारे काही देश कोरोना साथीचा गैरफायदा उचलून नियमांवर आधारलेली जागतिक व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापारी चौकट सुरक्षित राखणे गरजेचे असून लोकशाहीवादी देशांनी एकत्र येऊन सप्लाय चेन्स व्यवस्थित ठेवण्यावर भर द्यायला हवा’, असे तैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई इंग-वेन’ यांनी सांगितले.

‘कोपनहेगन डेमोक्रसी समिट’तैवानच्या राष्ट्राध्यक्षांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मिळालेले मानाचे स्थान ही चीनसाठी धक्का देणारी बाब ठरली आहे. चीनकडून गेल्या वर्षभरात तैवानला स्वतंत्र स्थान मिळू नये म्हणून आक्रमक प्रयत्न करण्यात येत आहेत. काही छोट्या देशांवर दबाव टाकून त्यांना तैवानशी असलेले संंबंध तोडण्यास भाग पाडण्यात आले आहे. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसारख्या यंत्रणेत तैवानला जागा मिळू नये म्हणून चीनने आपले आर्थिक व राजनैतिक सामर्थ्य वापरल्याचेही उघड झाले आहे. अशा पार्श्‍वभूमीवर युरोपात आयोजित समिटमधील तैवानच्या उपस्थितीवरून चीनने खरमरीत टीका केली आहे.

‘चीनबद्दल अफवा व खोटेपणा पसरविणार्‍या संस्थेकडून कोपनहेगनमधील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम म्हणजे निव्वळ राजकीय फार्स होता. लोकशाही हे इतर देशांना दडपण्याचे राजकीय साधन ठरु नये. युरोपियन नेत्यांनी लोकशाहीची खरी व्याख्या समजून घ्यावी व जनतेच्या हितासाठी काम करावे’, असे टीकास्त्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सोडले. चीनच्या डेन्मार्कमधील दूतावासानेही समिटवर टीका केली असून पाश्‍चात्य नेते ढोंगी असल्याचा आरोप केला आहे.

leave a reply