जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक कोटींवर

वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाबाधितांची संख्या एक कोटीहून अधिक झाली असून साथीने दगावणाऱ्यांची संख्या ५ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. तीन दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने पुढील आठवड्यात जगातील कोरोनग्रस्तांची संख्या एक कोटीवर जाईल, असा दावा केला होता. गेल्या तीन दिवसात अमेरिका व ब्राझीलसह लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. तसेच आशिया, आफ्रिकेतील काही देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

‘वर्ल्डओमीटर’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार जगभरात या साथीच्या बळींची संख्या ५,०२,५७४ वर गेली आहे. तसेच एकूण रुग्णांची संख्या १ कोटी १ लाख ६९,६७१ वर पोहोचली आहे. सुमारे ५५ लाखांहून अधिक रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. अमेरिकेत या साथीने दगावणाऱ्यांची संख्या एक लाख २८ हजारांच्या पुढे गेली आहे. तर एकूण रुग्णांची संख्या १६ लाख ११ हजारांवर गेली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून अमेरिकेत दरदिवशी सुमारे ४० हजार नवे रुग्ण आढळत आहेत.टेक्सास, ऍरिझोना, फ्लोरिडा राज्यांमध्ये नव्या रुग्णांची नोंद मोठ्या प्रमाणावर होत आहे. टेक्सासमध्ये तेथील प्रशासनाने रुग्णांची वाढती संख्या पाहता हॉटेल्स पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्राझीलमध्ये कोरोनाच्या साथीत बळी गेलेल्यांची संख्या ५७ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच मेक्सिकोमध्ये दरदिवशी जाणाऱ्या बळींची संख्येत वाढ झाली आहे. गेले काही दिवस मेक्सिकोत रोज किमान हजार जण दगावत असून कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या १६ हजारांच्या पुढे गेली आहे. आफ्रिकन देशांमधील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ७१ हजारांवर पोहोचली आहे. आफ्रिका खंडात कोरोना साथीतील बळींची संख्या ९५०० वर गेली आहे. यातील एक तृतीयांश रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेतील आहेत.

पाकिस्तानातील रुग्ण संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. बांगलादेशातही दरदिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांचा उच्चांक नोंदविला जात आहे. रशियात आतापर्यंत ६ लाख २७ हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. चीन सरकारने राजधानी बीजिंगला जोडून असलेल्या भागातील पाच लाख नागरिकांना लॉकडाउन करीत असल्याचे जाहीर केले आहे.

leave a reply