भारताच्या राजकीय नेतृत्त्वाने चीनला खडसावले

नवी दिल्ली – भारत मैत्रीला जागणारा देश आहे. मात्र, चिथावणी मिळाली तर नजरेला नजर भिडवून चोख प्रत्युत्तर कसे द्यायचे, ते देखील भारताला ठाऊक आहे. लडाखमध्ये शहीद झालेल्या वीर सैनिकांनी देशाची अखंडता आणि सार्वभौमत्तवाचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले. याद्वारे भारताच्या वज्र निर्धाराची प्रचिती सर्वांना आली असेल, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला खडसावले आहे. तर कोरोना आणि चीन या दोन्ही आघाड्यांवर भारत विजय मिळविल, असा विश्वास केन्द्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. भारतीय नेत्यांची ही विधाने भारताची चीनबाबतची भूमिका अधिकच आक्रमक बनल्याची साक्ष देत आहेत.

गलवान व्हॅलीत चिनी जवानांच्या आकस्मिक हल्ल्याला भारतीय सैनिकांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिल्यानंतर इथला सीमावाद चीनच्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. म्हणूनच चीन सीमेवर हजारो सैनिक तसेच संरक्षण साहित्याची तैनाती करुन भारताला धमकाविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी चीनचे लष्करी विश्लेषक भारताला धडा शिकविण्याची भाषा बोलू लागले आहेत. गलवान व्हॅलीतील संघर्षात भारी पडलेल्या भारतीय सैनिकांचा मुकाबला करण्यासाठी सीमेवरील चिनी सैनिकांना मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण दिले जात आहेत. भारतीय सैनिकांवर हल्ला चढविण्याच्या आधीही चिनी जवानांना असेच प्रशिक्षण देण्यात आले होते. पण ते कुचकामी ठरले.

चीनच्या लष्कराने भारताला धक्का देऊन आपला सन्मान परत मिळवावा, अशी मागणी चीनचे लष्करी विश्लेषक करीत आहेत. यासाठी चीन वेगवेगळे पर्यायही तपासून पाहत असल्याचे दिसते. मात्र, चीनच्या या डावपेचांची पूर्वकल्पना असलेल्या भारतीय सैनिकांकडून चीनला तशी संधी मिळण्याची शक्यता नाही. यामुळे, निराश झालेले चीनचे लष्कर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठी तैनाती व बांधकामे करुन आपले सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. या पार्श्वभूमीवर, भारताच्या पंतप्रधानांनी सीमावादाचा थेट उल्लेख करुन चीनच्या आगळीकीला प्रत्युत्तर देताना भारत कचरणार नाही, असा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय देखील या सीमावादात भारताच्या बाजूने उभा राहिल्याचे दिसत आहे. त्यातच भारताने चीनच्या सीमेवर आपली वायुसेना सक्रिय करुन चीनला दिलेला गंभीर परिणामांचा इशारा प्रत्यक्षात उतरविण्याची धमक भारताकडे असल्याचा इशारा दिला आहे.

पर्वतीय युद्धात भारताइतकी क्षमता व कौशल्य जगातील दुसऱ्या कुठल्याही देशाकडे नाही, याची कबुली खुद्द चिनी विश्लेषकांनीच दिली होती. तर भारतीय वायुसेनेकडे असलेली लढाऊ विमाने आणि भारतीय वैमानिकांचा अनुभव व कौशल्य या गोष्टींचा चीन सामना करू शकणार नाही. या संघर्षात भारत वरचढ ठरेल, असा विश्वास पाश्चिमात्य विश्लेषक व्यक्त करीत आहेत. तर भारताबरोबर संघर्ष छेडून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने आपल्या पायावर धोंडा मारुन घेतला, असे सूर पाश्चिमात्य माध्यमांनी लावले आहेत.

leave a reply