कम्युनिस्ट राजवटीचा अजेंडा राबविणाऱ्या चिनी प्रसारमाध्यमांवर अमेरिकेची कारवाई

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने चीनच्या चार माध्यम संस्था कम्युनिस्ट राजवटीच्या एजंट असल्याचा ठपका ठेवला आहे. अमेरिकेत कार्यरत या चारही संस्थांची नोंदणी ‘परदेशी यंत्रणा’(फॉरेन मिशन्स) म्हणून केली जाईल. त्याचबरोबर या संस्थांनी अमेरिकेतील त्यांच्या कर्मचार्‍यांची संख्या व पूर्ण माहिती प्रशासनाकडे सुपूर्द करावी, असे आदेश अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून देण्यात आले आहेत. ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनविरोधात छेडलेल्या राजनैतिक युद्धाचा भाग मानला जातो.

अमेरिकेची कारवाई

अमेरिकेने कारवाई केलेल्या चिनी माध्यम संस्थांमध्ये ‘ग्लोबल टाइम्स’, ‘पीपल्स डेली’, ‘चायना सेंट्रल टेलीव्हिजन’ व ‘चायना न्यूज सर्व्हिस’ यांचा समावेश आहे. ‘या संस्था स्वतंत्ररीत्या चालविण्यात येणाऱ्या वृत्तसंस्था नाहीत. या माध्यमांवर चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी व सरकारची मालकी तसेच नियंत्रण आहे’, असा ठपका ठेऊन परराष्ट्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी डेव्हिड स्टीलवेल यांनी कारवाईचे समर्थन केले. या माध्यमसंस्था परदेशी राजवटीचा प्रचार करणाऱ्या यंत्रणा आहेत, याची माहिती अमेरिकी जनतेला व्हायला हवी या उद्देशाने कारवाईचा निर्णय घेण्यात घेण्यात आल्याचे परराष्ट्र विभागाकडून सांगण्यात आले.

अमेरिकेची कारवाई

सोमवारी घेतलेल्या निर्णयानंतर अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने कारवाई केलेल्या चिनी प्रसारमाध्यमांची संख्या नऊ झाली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेने पाच चिनी माध्यमांवर कारवाई केली होती. त्यात चीनची आघाडीची ‘शिनहुआ’, ‘चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क’ (सीजीटीएन वृत्तवाहिनी), ‘चायना रेडिओ इंटरनॅशनल’, ‘चायना डेली डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन’ आणि ‘हाई तियान डेव्हलपमेंट’ यांचा समावेश होता.

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनची सर्व सूत्रे स्वत:च्या हाती घेतली आहेत. राष्ट्राध्यक्षपदाबरोबर लष्कराचे नेतृत्व आणि कम्युनिस्ट राजवटीवरही जिनपिंग यांचाच प्रभाव आहे. कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यात जिनपिंग यांना सपशेल अपयश आले आहे. मात्र चीनची कम्युनिस्ट राजवट प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने साथीबाबत चुकीचा प्रसार करून अपयश लपविण्याचा प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने केलेली कारवाई महत्वाची ठरते.

leave a reply