मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ८५७ वर

- ३८१ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र, मास्क लावणे बंधनकारक

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १२९७ पर्यंत पोहोचली आहे. यामधील ६० टक्के रुग्ण मुंबईतील असून मुंबईत आतापर्यंत ८५७ रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी मुबंईत ९ जण या साथीने दगावले आणि ७९ नवे रुग्ण आढळले. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत काही तासातच मुंबई महानगर परिक्षेत्रातील रुग्णांची संख्या १४३ ने वाढली. मुंबईतील वरळी, धारावी, अंधेरी, जोगेश्वरी सारखे भाग हॉटस्पॉट म्हणून समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शहरात रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनेही याला मंजुरी दिली आहे. तसेच मुंबईसह पुण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी जाताना प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे. मुंबईत ३८१ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतच दर दिवशी १०० हून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत असून येत्या काही दिवसात मुंबईतील रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढण्याची भयावह शक्यता व्यक्त केली जाते. यामुळे मुंबईत कडक उपाययोजना केल्या जात आहेत. ही साथ रोखण्यासाठी रुग्ण आढळत असलेले भाग सील करण्यात येत आहेत. आतापर्यंत ३८१ भाग प्रतिबंधित झोन घोषित झाले आहेत. ३१ मार्च पर्यंत प्रतिबंधित झोनची संख्या १४१ होती. गेल्या आठ दिवसातच प्रतिबंधीत झोनची संख्या २०० पेक्षा अधिकने वाढली आहे. या भागात नागरिकांची रहदारी संपूर्णपणे थांबविण्यात आली आहे.

वरळी भागात बुधवारी ५५ नवे रुग्ण आढळले होते. गुरुवारी धारावी भागात या साथीमुळे तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच धारावीतील रुग्णांची संख्या १३ पर्यंत पोहोचली आहे. धारावीतील दाट लोकवस्तीचे क्षेत्र बघता केंद्र सरकारच्या सूचनेनुसार या भागात औषधाची दुकाने सोडून सारे काही बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचवल्या जाणार आहेत. समूह संक्रमण रोखण्याकरीता हे उपाय करण्यात येत आहेत. अशाच प्रकारचे निर्बंध मुंबईतील आणखी २१ भागात लावण्याचा विचार आहे, हे भाग निश्चित करण्यात आले आहेत. येथे लवकरच कर्फ्यू सारखे प्रतिबंध लागण्याची शक्यता आहे.

तसेच वोक्हार्ट, जसलोक पाठोपाठ भाटिया रुग्णालयामधील नियमित रुग्ण सेवा बंद करण्यात आली आहे. येथे नर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याशिवाय खार येथील हिंदुजा, ब्रीच कॅण्डी रुग्णालयातही कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल झाल्याचे लक्षात आल्यावर येथेही तात्पुरत्या काळासाठी नियमित रुग्ण सेवा थांबविण्यात आली आहे.

leave a reply