अमेरिका व इस्रायलच्या ‘सायबर सिक्युरिटी टास्क फोर्स’ची स्थापना

‘सायबर सिक्युरिटी टास्क फोर्स’ची स्थापनाजेरूसलेम – खंडणीसाठी होणारे सायबर हल्ले अर्थात रॅन्समवेर हल्ले रोखण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त ‘सायबर सिक्युरिट टास्क फोर्स’ची स्थापना केली. यामुळे जागतिक अर्थव्यस्थेला सायबर हल्ल्यांपासून असणार्‍या धोक्याचा सामना करता येईल, असा दावा अमेरिकेने केला. अमेरिकेचे कोषागार विभाग व इस्रायलच्या अर्थमंत्रालयाच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.

गेल्या काही महिन्यांपासून इस्रायलवरील सायबर हल्ल्यांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्याचा दावा केला जातो. इराणमधील हॅकर्सचे गट या सायबर तसेच रॅन्समवेर हल्ल्यांमागे असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. सोमवारी देखील इराणमधील हॅकर्सच्या गटाने इस्रायलवर यशस्वी सायबर हल्ला केल्याचा दावा केला. यामध्ये इस्रायलच्या प्रमुख कंपन्यांची माहिती चोरल्याचे या इराणी हॅकर्स गटाचे म्हणणे आहे. इराणच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने या सायबर हल्ल्याची बातमी प्रसिद्ध केली.

इस्रायली लष्कराची गोपनीय दस्तावेज, नकाशे, त्रिमितीय आराखडे अशी बरीचशी माहिती या हॅकर्सनी चोरल्याचा दावा केला जातो. सोमवारी उशीरा या हॅकर्सनी व्हिडिओ प्रसिद्ध केला. यामध्ये इस्रायलच्या तेल अविव शहर तसेच संवदेनशील ठिकाणांच्या फोटोज्चा समावेश असल्याचा दावा केला. इराणच्या हॅकर्सनी केलेल्या या दाव्यावर इस्रायलने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण रॅन्समवेर अर्थात खंडणीसाठी होणारे सायबर हल्ले इस्रायलमध्ये वाढत चालले आहेत.

‘सायबर सिक्युरिटी टास्क फोर्स’ची स्थापनाइस्रायलप्रमाणे अमेरिकेवरील रॅन्समवेरच्या हल्ल्यांची तीव्रता वाढल्याचा दावा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या कोषागार विभागाचे उपमंत्री वॅली एडीयीमो यांनी आपल्या शिष्टमंडळासह इस्रायलचा दौरा केला. यावेळी इस्रायलचे अर्थमंत्री एविग्दोर लिबरमन यांनी अमेरिकी कोषागार विभागाच्या उपमंत्र्यांची भेट घेऊन संयुक्त सायबर सुरक्षा टास्क फोर्सची स्थापना केल्याचे जाहरि केले. लवकरच यासंबंधीचा सामंजस्य करार केला जाईल. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सायबर सुरक्षेशी संबंधित माहितीची देवाणघेवाण सुरू होईल. राष्ट्रीय तसेच जागतिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरणार्‍या सायबर हल्ल्यांबाबतच्या माहितीचे आदानप्रदान केले जाईल. त्याचबरोबर अतिमहत्त्वाच्या आर्थिक पायाभूत सुविधा आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या सुरक्षेसाठी हे टास्क फोर्स काम करील, अशी माहिती एडीयीमो यांनी दिली.

‘जागतिक अर्थव्यवस्था सावरत असताना, रॅन्समवेर हल्ले आणि आर्थिक पातळीवरील धोक्यांची आव्हाने वाढू लागली आहेत. यापासून अमेरिका आणि इस्रायलच्या आर्थिक हितसंबंधांना धोका संभवतो. अशा परिस्थितीत, सायबर सुरक्षेविषयीचे सदर सहकार्य उभय देशांच्या आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरते’, असे एडीयीमो पुढे म्हणाले. तर पुढच्या वर्षी तेल अविवमध्ये होणार्‍या ‘सायबर टेक ग्लोबल’ या बैठकीतही अमेरिका सहभागी होणार असल्याचे एडीयीमो यांनी सांगितले.

leave a reply