ब्राझीलमधील कोरोनाच्या बळींची संख्या ५० हजारांवर

- जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९० लाखांवर पोहोचली

वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाने दगावलेल्यांची संख्या ४ लाख ६८ हजारांवर पोहोचली आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८९ लाख ६४ हजारांच्या पुढे गेली आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोनाची लागण झालेले रुग्ण असलेल्या ब्राझीलमध्ये कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्येच कोरोनाने सर्वाधिक जणांचा बळी घेतला असून येथील कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू दर ५ टक्क्यांवर पोहोचला आहे. लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशातच कोरोनाच्या रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे.

Coronavirusजगभरात सध्या लॉकडाऊन शिथिल होत आहेत. मात्र त्याचवेळी कोरोनाच्या रुग्णांची संख्या अचानक वाढू लागल्याचे दिसत आहे. अमेरिकेतील या साथीच्या रुग्णांची संख्या २३ लाख ३५ हजारावर पोहोचली असून या साथीमुळे दगावलेल्यांची संख्या १ लाख २२ हजारांवर गेली आहे. अमेरिका खंडात ब्राझीलमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वाधिक वेगाने वाढत आहे. येथे एकाच दिवसात ३४,६६६ नवे रुग्ण आढळले, तसेच १०२२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या देशात कोरोनाच्या साथीमुळे दगावलेल्यांची संख्या ४९,९७६ वर पोहोचली आहे. तसेच एकूण रुग्णांची संख्या १० लाख ७६ हजार झाली आहे.

‘वर्ल्डओमीटर’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि ब्राझीलनंतर लॅटिन अमेरिकेत सर्वाधिक वाईट स्थिती पेरू आणि चिली या देशांमध्ये आहे. पेरूमध्ये रुग्णांची संख्या २ लाख ५१ हजार, तर चिलीमध्ये २ लाख ३६ हजारांवर पोहोचली आहे. ब्रिटनमधील रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली असून आतापर्यंत या देशात ४२ हजार ५०० जण दगावले आहेत. दरम्यान दोन आठवड्यांपूर्वी कोरोनमुक्त घोषित करण्यात आलेल्या न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळले. तसेच चीनची राजधानी बीजिंगमध्ये २२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

leave a reply