भारत-चीन सीमावादात अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा मध्यस्थीचा नवा प्रस्ताव

India-Chinaवॉशिंग्टन – ‘भारत-चीन सीमेवर अत्यंत कठीण परिस्थिती आहे. अमेरिका, भारत आणि चीन अशा दोन्ही देशांबरोबर बोलणी करीत आहे. सीमारेषेवर दोन्ही देशांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. भारत व चीनदरम्यान जबरदस्त संघर्ष झाला आहे. पुढे काय घडते यावर अमेरिकेचे बारीक लक्ष आहे. वाद सोडविण्यासाठी अमेरिका दोन्ही देशांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीन सीमावादात पुन्हा एकदा मध्यस्थी करण्याचे संकेत दिले.

गेल्या आठवड्यात सोमवारी १५ जूनला चीनने विश्वासघात करून भारतीय सीमेत हल्ला चढविला होता. त्यात, भारताचे २० सैनिक शहीद झाले होते. चिनी जवानांनी लोखंडी सळ्या, काठ्या आणि दगडफेक करीत हल्‍ला चढविला होता. भारतीय सैनिकांनी चिनी जवानांवर केलेल्या प्रतिहल्ल्यात चीनचे अनेक जवान ठार झाले होते. मात्र चीनने अजूनही मृत जवानांची संख्या जाहीर केलेली नाही. गलवान व्हॅलीतील या संघर्षानंतर चीनविरोधात आक्रमक झालेल्या भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरून चांगले समर्थन मिळत आहे.

Trumpअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात चीनची चूक असल्याची उघड भूमिका घेतली आहे. पॉम्पिओ यांनी संघर्षात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांप्रती संवेदनाही व्यक्त केल्या होत्या. चीनचे वरिष्ठ नेते यांग जिएची यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतही अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी भारत-चीन वादाचा मुद्दा उपस्थित केल्याची माहिती परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत-चीन वादात पुन्हा एकदा मध्यस्थीचे संकेत देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

यापूर्वी गेल्या महिन्यातही ट्रम्प यांनी भारत चीन मध्यस्थीचे संकेत देताना भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याविषयी वक्तव्य करून खळबळ उडवली होती. ‘भारत व चीनमध्ये मोठा वाद पेटलेला आहे. मी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी बोललो. त्यांचा मूड अजिबात चांगला नाही, चीनही याबाबत असमाधानी आहे, अशी विधाने करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळ उडवून दिली होती.

भारत व चीन दोन्हही १.४ अब्ज लोकसंख्या असलेले आणि लष्करीदृष्ट्या सामर्थ्यशाली देश आहे. त्यांच्यातील वाद सोडविण्यात माझे सहकार्य हवे असल्यास मी मध्यस्थीसाठी तयार आहे, असे सांगून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत भारत–चीन सीमावाद सोडविण्यासाठी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला होता.

leave a reply