देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या चार लाख २० हजारांवर

नवी दिल्ली/मुंबई – चोवीस तासात देशात कोरोनाच्या १५,४१३ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या रविवारच्या सकाळपर्यंत ४,१०,४६१ वर पोहोचली होती, तर रात्रीपर्यंत ही संख्या वाढून चार लाख २० हजारांच्या पुढे गेली. महाराष्ट्रात ३,८७०, दिल्लीत ३००० हजार आणि तामिळनाडूत २,५३२ नवे रुग्ण आढळले. रविवारी या तीन राज्यातच ९,४०२ रुग्णांची नोंद झाली आहे.

Corona-Indiaदेशात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा आलेख सतत वाढत आहे. देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या चार लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या सलग अकरा दिवसांपासून देशात १० हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. देशात १०० वरून रुग्णांची संख्या १ लाख होण्यास ६४ दिवस लागले होते. त्यानंतर पुढील पंधरा दिवसात या साथीच्या रुग्णांची संख्या दोन लाखांवर गेली होती. तर तीन लाखांवर रुग्ण संख्या जाण्यास आणखी दहा दिवस लागले होते. तीन लाखांहून चार लाख रुग्ण संख्या केवळ आठ दिवसात झाली आहे. सध्या देशात सुमारे १५ हजार नवे रुग्ण दरदिवशी आढळू लागले आहेत. हा वेग पाहता पुढील सहा दिवसात देशातील कोरोनाची रुग्णसंख्या पाच लाखांच्या पुढे गेलेली असेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

देशात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. जून महिन्यातच २० तारखेपर्यंत २० लाख ६८ हजार चाचण्या झाल्या आहेत. रविवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात १.९० लाख चाचण्या झाल्या आहेत. मात्र त्याचवेळी एक दिलासादायक बातमी येत असून या साथीचे रुग्ण बरे होण्याचा दर ५५.४८ टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत २ लाख २७ हजार रुग्ण बरे झाले आहेत. दर दिवशी सुमारे १३ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत.

दरम्यान, रविवारी महाराष्ट्रात १०१ जणांचा बळी गेला. दिल्लीत ६३ जण दगावले. तामिळनाडूत ५३ जणांच्या बळी गेला. याआधी रविवारच्या सकाळपर्यँतच्या चोवीस तासात देशभरात ३०६ जणांचा बळी गेला होता. त्यामुळे देशात आतापर्यंत या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या १३,२५४ वर पोहोचली होती. तर रात्रीपर्यंत बळींची संख्या साडे तेरा हजारांच्या पुढे गेल्याचे राज्यांनी जाहीर केलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

leave a reply