भारतात कोरोनाने दगावलेल्यांची संख्या १२ हजारांवर

नवी दिल्ली/मुंबई – देशात कोरोनाने केवळ चार दिवसात ३,०१७ जण दगावल्याची नोंद झाली असून एकूण ४५ हजार नवे रुग्ण आढळले. मंगळवारी महाराष्ट्र सरकारने राज्यात कोरोनाने झालेले १४०९ मृत्यू जाहीर केले होते. त्यामुळे देशात एकाच दिवसात कोरोनाच्या २००३ बळींची नोंद झाली आणि या साथीने दगावलेल्यांची संख्या ११९०३ वर पोहोचली. बुधवारी रात्रीपर्यंत देशातील या साथींच्या बळींची संख्या १२ हजारांच्या पुढे गेल्याचे स्पष्ट होते. चोवीस तासात महाराष्ट्रातच ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तामिळनाडूतही ४८ जण दगावले आहेत.

Coronavirus, India

देशात बुधवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात १०,९९४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे देशात या साथीच्या रुग्णांची संख्या ३,५४,०६५ वर पोहोचली होती, तर रात्रीपर्यंत देशातील या साथीची रुग्णसंख्या ३ लाख ६० हजारांच्या पुढे पोहोचल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्रात दिवसभरात ११४ जणांचा बळी गेला आणि ३३०७ नवे रुग्ण आढळले. यामुळे राज्यात या साथीने दगावलेल्यांची संख्या ५६५१ वर, तर एकूण रुग्णांची संख्या १,१६,७५२ वर पोहोचली आहे. मुंबईतील ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातही १२ जण चोवीस तासात दगावले आणि ४६० नवे रुग्ण आढळले

तामिळनाडूतील रुग्णांची संख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. ५० हजाराहून अधिक रुग्ण संख्या असलेले तामिळनाडू दुसरे राज्य ठरले असून चोवीस तासात २१७४ नवे रुग्ण आढळले. दिल्लीतही रुग्ण संख्या ५० हजारांच्या जवळ पोहोचली आहे. बुधवारी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यन्द्र जैन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राज्यस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरियाणा, तेलंगणा, ओडिशाचे मुख्यमंत्री आणि जम्मू काश्मीरच्या गव्हर्नर बरोबर चर्चा केली. या राज्यांमध्येच देशातील ८५ टक्के कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या राज्यांकडे केंद्र सरकार अधिक लक्ष पुरवीत आहे. पंतप्रधानांनी यावेळी राज्यांना आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याचा आणि कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याचा सल्ला दिला.

leave a reply