भारताच्या पंतप्रधानांचा चीनला इशारा

नवी दिल्‍ली – भारत मातेच्या रक्षणासाठी गलवान व्‍हॅलित लढून धारातीर्थी पडलेल्‍या विरपुत्रांचा देशाला कधीही विसर पडणार नाही. त्‍यांचे बलिदान व्‍यर्थ जाणार नाही अशा शब्‍दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नल बाबू यांच्‍यासह शहिद झालेल्‍या २0 जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधानांचा हा शोक संदेश म्‍हणजे भारताने चीनला दिलेला सज्‍जड इशारा असल्‍याचे विश्लेषकांचे म्‍हणणे आहे.

भारत, पंतप्रधान, चीन

भारत सांस्‍कृतिकदृष्ट्या शांतिप्रिय देश आहे. मात्र कोणी खोडी काढल्‍यास भारत त्‍याला उत्तर दिल्‍यावाचून स्‍वस्‍थ बसणार नाही. देशाच्‍या सार्वभौमत्‍वाचा प्रश्न निर्माण झाला तर त्‍याच्या रक्षणासाठी भारतीय सर्वोच्‍च बलिदान द्यायला सिद्ध असतात हे वारंवार स्‍पष्ट झालेले आहे, असे पंतप्रधान म्‍हणाले. भारताच्‍या राजकिय नेतृत्‍वाकडून चीनला कणखर शब्‍दात देण्यात आलेला हा इशारा म्‍हणजे भारताच्‍या भूमिकेत झालेल्‍या आक्रमक बदलांचे संकेत ठरतात. यापुढे भारतीय सैनिक चीनच्‍या घुसखोरीला थोपविण्यासाठी संयमी भूमिका घेणार नाही तर चीनला कुठल्‍याही प्रकारे उत्तर देण्याचे संपूर्ण स्‍वातंत्र भारत सरकारने आपल्‍या लष्कराले दिले आहे. सामरिक विश्लेषकांनी पंतप्रधानांचा हा संदेश भारतीय लष्कराला मिळालेल्‍या या स्‍वातंत्र्याचा दाखला देऊन आता घुसखोरी करणाऱ्या चीनी जवानांची धडगद नसल्‍याचे बजावले आहे.

गलवान व्‍हॅलिमध्ये चीनी जवानांनी भारतीय सैनिकांवर केलेला हल्‍ला म्‍हणजे पूर्वनियोजित कट होता. याची सूत्र चीनच्‍या वरिष्ठ राजकीय नेतृत्‍वाकडूनच हलविण्यात आली होती असे स्‍पष्ट होऊ लागले आहे. काही दिवसांपूर्वीच चीनच्‍या राष्ट्रध्यक्षांचे निकटवर्तीय मानल्‍या जाणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. याकडे भारतीय सामरिक विश्लेषक लक्ष वेधत आहेत. त्‍यामुळे हा हल्‍ला चीनच्‍या राष्टाध्यक्षांच्‍या इशाऱ्यानेच झाला या दाव्‍याला पुष्टी मिळत आहे.

चीनला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्‍तरावर मिळत असलेल्‍या आव्‍हांनामुळे राष्ट्राध्यक्ष क्षी जिं पींग यांचे आसन अस्‍थिर बनले होते. म्‍हणूनच भारता बरोबरच्‍या सिमेवर तणाव माजवून राष्टाध्यक्ष क्षी जि पिंग आपले स्‍थिर करू पाहत आहे. मात्र हा डाव त्‍यांच्यावर उलटू शकतो असे भारतीय विश्लेषकांचे म्‍हणणे आहे. लडाखपासून ते अरूणाचल प्रदेशपर्यंतच्‍या चीनला भिडलेल्या सिमेवर भारतीय लष्कराने तसेच वायुसेनेने जय्यत तयारी करून चीनला धडा शिकविण्यासाठी पावले उचलल्‍याचे संकेत दिले आहे. तसेच भारत सरकारने तिनही संरक्षण दलांना कुठल्‍याही परिस्‍थितीतीला तोंड देण्यासाठी सज्‍ज व्‍हा असे स्‍पष्ट आदेश दिल्‍याच्या बातम्‍या प्रसिद्ध झाल्‍या आहेत.

भारतीय लष्कर व वायुसेनाच नाही तर नौदलानेही चीनला प्रत्‍युत्तर देण्याची केलेली तयारी लक्षणीय ठरते. पुढच्‍या काळात चीनला भारताचा संयम गृहित धरता येणार नाही याची जाणीव या देशाला करून दिली जात आहे. जगभरातील प्रमुख देशांचा भारताला पाठिंबा असून चीन आपल्‍या सर्वच शेजारिल देशांना आपल्‍या सामर्थ्याच्‍या धाकात ठेवण्याचा प्रयत्‍न करित असल्‍याचे आरोप आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये केले जात आहे. मात्र चीनला टक्‍कर देणारा भारत हा एकमेव शेजारी देश असून भारतासमोर चीनची दंडेली चालणार नाही असा इशारा एका तैवानी वर्तमानपत्रांने दिला आहे. त्‍याला सोशल मिडियावर जबरदस्‍त प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्‍थितीत भारताच्‍या पंतप्रधानांनी शहिद जवानांना श्रद्धांजली देताना चीनला खरमरित शब्‍दात दिलेला इशारा साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेत आहे.

leave a reply