२६/११च्या सूत्रधारांना अजूनही शिक्षा झालेली नाही

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

मुंबई – मुंबईवर झालेला २६/११चा हल्ला म्हणजे केवळ भारतावर झालेला दहशतवादी हल्ला नव्हता. तर तो आंतरराष्ट्रीय समुदायावरील हल्ला ठरतो. असे असूनही या दहशतवादी हल्ल्याचे सूत्राधार अजूनही सुरक्षितरित्या वावरत आहेत. त्यांना अजूनही शिक्षा झालेली नाही. त्यांच्यावर कारवाईच्या प्रस्तावाला राजकीय हेतू समोर ठेवून विरोध केला जातो, ही बाब आंतरराष्ट्रीय समुदायाच्या विश्वासार्हतेला धक्का देणारी ठरते, अशा शब्दात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादाचा पुरस्कर्ता पाकिस्तान व दहशतवाद्यांचा बचाव करणाऱ्या चीनचे वाभाडे काढले. २६/११च्या हल्ल्याचे लक्ष ठरलेल्या मुंबईच्या ताजमहाल हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दहशतवादविरोधी परिषदेत परराष्ट्रमंत्री जयशंकर बोलत होते.

mastermindsसंयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची दहशतवादविरोधी बैठक शुक्रवारी ताजमहाल हॉटेलमध्ये सुरू झाली. यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी २६/११च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देऊन या हल्ल्याची आखणी करणारे, त्याच्या अंमलबजावणीचे आदेश देणारे अजूनही सुरक्षितपणे वावरत असल्याची बाब परराष्ट्रमंत्र्यांनी लक्षात आणून दिली. राजकीय कारणांमुळे या दहशतवाद्यांवरील कारवाई शक्य झालेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब ठरते, असे सांगून जयशंकर यांनी एकाच वेळी पाकिस्तानला व दहशतवाद्यांवरील सुरक्षा परिषदेची कारवाई रोखणाऱ्या चीनवर निशाणा साधला. गेल्या काही आठवड्यांमध्ये चीनने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांवरील कारवाईच्या प्रस्तावाला विरोध केला होता. यामुळे सुरक्षा परिषदेत मांडण्यात आलेले या दहशतवाद्यांवरील कारवाईचे प्रस्ताव निकालात निघाले. थेट उल्लेख केला नसला, तरी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी याद्वारे पाकिस्तान तसेच चीनवर तोफ डागल्याचे दावे माध्यमे करीत आहेत.

दहशतवादी हल्ला ही काही आकस्मिकरित्या होणारी बाब नाही. यासाठी दहशतवाद्यांना पैसा व इतर स्त्रोत लागतात. हे सारे स्त्रोत रोखण्यासाठी हालचाली करणे आवश्यक ठरते. सध्याच्या काळात साऱ्या जगाला दहशतवादी हल्ल्यांचा धोका संभवतो. पण भारताने याची सर्वाधिक किंमत मोजलेली आहे. भारत वर्षानुवर्षे सीमेपलिकडून येणाऱ्या दहशतवादाचा मुकाबला करी आहे. याने आमच्या दहशतवादाच्या विरोधातील लढ्याचा निर्धार कमी झालेला नाही, असे जयशंकर पुढ् म्हणाले. त्याचवेळी थेट नामोल्लेख टाळून पाकिस्तानात अजूनही २६/११चे गुन्हेगार मोकाट वावरत आहेत, त्यांना सुरक्षा पुरविली जात आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. या दहशतवाद्यांवर कारवाई झाली नाही, हे आपल्या सर्वांच्या दहशतवादविरोधी लढ्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब आहे, याची जाणीव देखील परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला करून दिली.

२६/११चा हल्ला हा केवळ मुंबई किंवा भारतावरील हल्ला नव्हता. तर तो आंतरराष्ट्रीय समुदायावरील हल्ला होता. भारतीयांबरोबरच सुमारे २३ देशांचे नागरिक या हल्ल्यात बळी पडले होते, असे सांगून या हल्ल्याची तीव्रता जयशंकर यांनी पुन्हा एकदा जगासमोर मांडली आहे. अशा परिस्थितीत दहशतवाद्यांना होणारा पैशांचा पुरवठा रोखण्यासाठी ‘फायनॅन्शिअल ॲक्शन टास्क फोर्स-एफएटीएफ’ सारख्या संघटनांनी अधिक प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे परखड मत जयशंकर यांनी व्यक्त केले. यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने एफएटीएफशी समन्वय साधून काम करावे, अशी मागणी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान, नुकतीच एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून पाकिस्तानची सुटका झालेली आहे. दहशतवाद्यांचे आर्थिक स्त्रोत रोखण्यासाठी समाधानकारक कामगिरी केल्याचे प्रशस्तीपत्रक देऊन एफएटीएफने पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून मुक्त केले. त्यामुळे राजकीय हेतूसाधी दहशतवादाच्या विरोधातील कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते, ही भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली टीका अमेरिकेलाही लागू पडत आहे. कारण अमेरिकेने दाखविलेल्या दयाबुद्धीमुळेच पाकिस्तानला एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडता आले, असा दावा विश्लेषक करीत आहेत.

leave a reply