युरोपात कोरोनाची नवी लाट धडकली

- जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

कोरोनाची नवी लाटजीनिव्हा/ब्रुसेल्स – युरोप खंडात कोरोनाची नवी लाट धडकली असून आरोग्ययंत्रणांनी तातडीने हालचाली करायला हव्यात, असा इशारा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) दिला. गेल्या दीड महिन्यात युरोपातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या तिपटीने वाढल्याकडे ‘डब्ल्यूएचओ’ने लक्ष वेधले आहे. युरोप खंडात गेल्याच आठवड्यात कोरोनाचे जवळपास 30 लाख रुग्ण आढळले होते. सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदविणाऱ्या देशांमध्ये ब्रिटनसह जर्मनी, फ्रान्स, इटली या देशांचा समावेश आहे.

कोरोनाची नवी लाटगेल्याच आठवड्यात ‘डब्ल्यूएचओ‘ने साथ अजूनही संपलेली नाही, असा इशारा दिला होता. अमेरिका व युरोपसह जगाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे नवे उद्रेक समोर येत असून युरोपात त्याची तीव्रता मोठी असल्याकडे ‘डब्ल्यूएचओ’च्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. ‘कोरोनाच्या नव्या उद्रेकाने युरोपला धडक दिली आहे. युरोपमधील आरोग्ययंत्रणांनी हा उद्रेक रोखण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत. उपाययोजनांसाठी पुढील ॠतुची वाट बघणे म्हणजे खूप उशिर झाला आहे, असे म्हणावे लागेल. युरोपातील कोरोनाची स्थिती गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यातील उद्रेकाप्रमाणेच आहे’, या शब्दात ‘डब्ल्यूएचओ’चे युरोपातील प्रमुख डॉक्टर हॅन्स क्लुज यांनी बजावले.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 56 कोटींवर पोहोचली असून 63 लाखांहून अधिक जण या साथीत दगावले आहेत. गेल्या दोन महिन्यात अमेरिका, युरोपसह चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया यासारख्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात जगभरात 15 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत, तर जवळपास तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सुमारे 50 टक्के हिस्सा युरोपिय देशांचा असल्याचे सांगण्यात येते. ऑस्ट्रेलियात गेल्या आठवड्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून जनतेला ‘वर्क फ्रॉम होम’चे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोनाची नवी लाटचीनमध्ये दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 400वर पोहोचली असून काही नव्या शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. अमेरिकेतील कोरोनाची रुग्णसंख्या प्रतिदिन दीड लाखांनजिक पोहोचली असून दगावणाऱ्यांची संख्या 500वर गेली आहे. व्हाईट हाऊसमधील ‘कोविड रिस्पॉन्स कोऑर्डिनेटर’ डॉ. आशिष झा यांनी कोरोनाव्हायरस अजूनही धोका असून अमेरिकेत ‘बीए डॉट5′(इअ.5) चा संसर्ग सर्वाधिक असल्याकडे लक्ष वेधले.

अनेक देशांनी शिथिल केलेले आरोग्यविषयक तसेच सामाजिक निर्बंध हेदेखील वाढत्या रुग्णसंख्येमागील महत्त्वाचे कारण असल्याकडेे जागतिक आरोग्य संघटनेने लक्ष वेधले आहे.

leave a reply