इंधनपुरवठा सुरळीत राखण्यासाठी युरोपिय महासंघाचा अझरबैजानबरोबर करार

fuel-supplyबाकु – रशियाकडून रोखण्यात येणाऱ्या इंधनवायू पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी युरोपिय महासंघाने हालचाली सुरू केल्या आहेत. सोमवारी युरोपिय महासंघ व अझरबैजानमध्ये इंधनवायू पुरवठ्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारानुसार, अझरबैजान युरोपिय देशांना होणाऱ्या इंधनपुरवठ्यात दुपटीने वाढ करणार आहे. काही दिवसांपूर्वी मध्य आशियातील कझाकस्ताननेदेखील युरोपिय देशांचा इंधनपुरवठा वाढविण्याचे आश्वासन दिले होते.

युरोपिय कमिशनच्या प्रमुख उर्सुला व्हॉन डेर लेयेन यांनी सोमवारी अझरबैजानचा दौरा केला. यावेळी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलियेव्ह यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर इंधनपुरवठा करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. करारानुसार, अझरबैजान पुढील पाच वर्षात युरोपिय देशांना होणारा इंधनपुरवठा 20 अब्ज घनमीटरपर्यंत वाढविणार आहे. सध्या अझरबैजान युरोपिय देशांना प्रतिवर्षी सुमारे आठ अब्ज घनमीटर इतका इंधनवायू निर्यात करतो.

रशियन इंधनाचा वापर टाळण्यासाठी महासंघाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये अझरबैजान हा महत्त्वाचा भागीदार आहे, अशा शब्दात कमिशनच्या प्रमुख लेयेन यांनी कराराचे स्वागत केले. अझरबैजान हा विश्वासार्ह इंधन सहकारी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. रशियन इंधनाचा वापर कमी करण्यासाठी युरोपिय महासंघ व सदस्य देशांनी कतार, अल्जिरिआ तसेच युएई या देशांबरोबरही इंधनकरार केल्याचे समोर आले आहे.

leave a reply