इराणच्या अणुकार्यक्रमावर हल्ला चढविणे इस्रायलची नैतिक जबाबदारी ठरते

- इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख

नैतिक जबाबदारीजेरूसलेम – इराणकडे अणुबॉम्बची निर्मिती करण्याची क्षमता असल्याची घोषणा इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्या सल्लागाराने काही दिवसांपूर्वी केली होती. अमेरिकेचे बायडेन प्रशासन अणुकराराबाबत वाटाघाटीवर ठाम असताना इराणची घोषणा इस्रायलसाठी इशारा असल्याचे विश्लेषकांनी म्हटले होते. यावर इस्रायलची प्रतिक्रिया उमटली असून इराणच्या अणुकार्यक्रमावर लष्करी हल्ला चढविणे ही इस्रायलची नैतिक जबाबदारी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यावश्यक ठरते, असे इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी यांनी म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात इस्रायलच्या दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणच्या अणुकराराचा मुद्दा वाटाघाटीने सोडविण्यावर ठाम असल्याचे जाहीर केले. वाटाघाटी फिस्कटल्यानंतर इराणविरोधात शेवटचा पर्याय म्हणून लष्करी कारवाई करण्याचे बायडेन म्हणाले होते. बायडेन प्रशासनाच्या या भूमिकेला इस्रायलने मूक संमती असल्याचे दावे विश्लेषकांनी केले होते.

पण त्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या सल्लागारांनी अणुबॉम्बच्या निर्मितीची क्षमता असल्याचे जाहीर करून आखातातील तणाव वाढविला. या पार्श्वभूमीवर, इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी यांनी लष्कराला युद्धासाठी तयार राहण्याची सूचना केली. ‘इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी वाटाघाटींना प्राधान्य दिले जात आहे. पण वाटाघाटी अल्पकाळासाठी यशस्वी ठरतात आणि त्यानंतर उल्लंघन किंवा विश्वासघातामुळे अपयशी ठरतात, हे इतिहासात आपण अनुभवले आहे’, अशा शब्दात कोशावी यांनी वाटाघाटींवरील अविश्वास व्यक्त केला. तसेच इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीपासून रोखणे ही इस्रायलच्या लष्कराची नैतिक जबाबदारी ठरते, असे कोशावी यांनी स्पष्ट केले.

याआधी इराणने इस्रायलला जगाच्या नकाशावरून नष्ट करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्याचा दाखला देऊन इस्रायली नेते इराणच्या हेतूवर कायम प्रश्न उपस्थित करीत आले आहेत. त्यामुळेच इराणला अणुबॉम्बची निर्मिती करण्यापासून रोखले नाही, तर इस्रायलचे अस्तित्त्व धोक्यात येईल, असे इस्रायल बजावत आहे. कोशावी यांनी दिलेल्या इशाऱ्यातूनही ही बाब समोर येत आहे.

leave a reply