बर्ड फ्ल्यूच्या नव्या उदे्रकाचे रुपांतर जागतिक साथीत होईल

- इस्रायली शास्त्रज्ञांचा इशारा

जेरुसलेम – इस्रायलमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा नवा उद्रेक झाला असून त्याचे रुपांतर मोठ्या जागतिक साथीत होऊ शकते, असा इशारा इस्रायली शास्त्रज्ञांनी दिला आहे. इस्रायलमध्ये आलेल्या साथीत जवळपास साडेपाच हजार जंगली बगळ्यांचा मृत्यू झाला. हे बगळे युरोप, आशिया व आफ्रिका अशा तीन खंडात प्रवास करणारे असल्याचे समोर आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जंगली बगळ्यांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे इस्रायली शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

बर्ड फ्ल्यूच्या नव्या उदे्रकाचे रुपांतर जागतिक साथीत होईल - इस्रायली शास्त्रज्ञांचा इशारासप्टेंबर ते नोव्हेंबर अशा तीन महिन्यांच्या कालावधीत युरोपातील प्रमुख देशांसह जपान तसेच रशियात ‘बर्ड फ्ल्यू’ची मोठी साथ आल्याने लक्षावधी पक्ष्यांची कत्तल करणे भाग पडले होते. त्यानंतर आता इस्रायलच्या ‘हुला नेचर रिझर्व्ह’मध्ये नवा उद्रेक समोर आला आहे. युरोपमधून आफ्रिका व आशियात जाणारे आणि पुन्हा माघारी येणारे हजारो जंगली बगळे ‘हुला नेचर रिझर्व्ह’मध्ये आश्रय घेतात. या बगळ्यांपैकी जवळपास साडेपाच हजार बगळ्यांचा मृत्यू झाला आहे. या भागात येणार्‍या एकूण बगळ्यांपैकी ही संख्या १५ टक्क्यांहून अधिक असल्याचे इस्रायली शास्त्रज्ञांनी सांगितले.

‘बर्ड फ्ल्यूचा विषाणूतून मानवाला झालेला संसर्ग प्राणघातक ठरु शकतो. या विषाणूत स्वतःची संरचना बदलण्याची क्षमता आहे. ही बाब मोठ्या व भयावह आपत्तीसाठी कारणीभूत ठरु शकते. कोरोनाच्या साथीमध्ये हे दिसून आले आहे’, असा इशारा इस्रायली शास्त्रज्ञ योसी लेशेम यांनी दिला. बर्ड फ्ल्यूच्या नव्या उदे्रकाचे रुपांतर जागतिक साथीत होईल - इस्रायली शास्त्रज्ञांचा इशाराइस्रायलच्या पर्यावरण मंत्रालयात प्रमुख वैज्ञानिक म्हणून कार्यरत असणार्‍या नोगा क्रॉनफेल्ड शॉर यांनी, हुला रिझर्व्हमध्ये झालेला हजारो बगळ्यांचा मृत्यू जागतिक स्तरावर परिणाम घडविणारी घटना ठरु शकते, असे बजावले आहे.

‘पाळीव पक्ष्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ आढळल्यास त्यांची कत्तल करून परिसराचे निर्जंतुकीकरण करता येते, मात्र जंगली पक्ष्यांच्या बाबतीत काहीच करणे शक्य नाही. त्यामुळे साथीची व्याप्ती किती वाढेल याचा अंदाज नाही’ असा दावा योव मोत्रो यांनी केला. गेल्या महिन्यात चीनमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’च्या मानवी संसर्गाची २१ प्रकरणे समोर आली होती. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने(डब्ल्यूएचओ) दिली होती. या पार्श्‍वभूमीवर इस्रायलमधील उद्रेक व शास्त्रज्ञांनी दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.

leave a reply