जगभरातील कोरोना बळींची संख्या चार लाखांनजिक

बाल्टिमोर – कोरोनाव्हायरसमुळे जगभरात बळी जाणाऱ्यांची संख्या चार लाखांनजिक जाऊन पोहोचली आहे. गेल्या २४ तासात सहा हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या ६७ लाखांवर गेली आहे. रशिया व ब्राझीलपाठोपाठ दक्षिण आफ्रिका आणि इराकमध्ये रुग्णांच्या संख्येत २४ तासांमध्ये विक्रमी प्रकरणांची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘डब्ल्यूएचओ’ने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेणाऱ्या देशांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढू शकतात, असा इशारा दिला आहे.

Corona across World

जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि वर्ल्डओमीटरने दिलेल्या माहितीनुसार जगभरात कोरोनाव्हायरसने दगावलेल्याची संख्या ३,९५, १४३ वर पोहोचली आहे. २४ तासांमध्ये ६,३८४ जणांचा बळी गेला असून त्यात ब्राझीलमधील १,४७३ जणांचा समावेश आहे. ब्राझीलमध्ये गेले काही दिवस सातत्याने दर दिवशी बळींची संख्या एक हजारांपेक्षा अधिक नोंदवली जात असून ही चिंतेची बाब मानली जाते.

Corona across World

कोरोनाच्या जगभरातील रुग्णांची संख्या ६७,६६,५३२ झाली असून २४ तासांमध्ये दीड लाखांहून अधिक प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यात अमेरिकेतील १९,३२,८०८ रुग्णांचा समावेश आहे. अमेरिकेमागोमाग असणाऱ्या ब्राझीलमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संखया ६,२१,८७७ झाली आहे. रशियात सलग दुसऱ्या दिवशी ८ हजारांहून जास्त रुग्ण आढळून आले असून संख्या साडेचार लाखांनजीक पोहोचली आहे.

रुग्ण व बळी दोहोंची संख्या वाढत असतानाच ‘डब्ल्यू एचओ’ने नवा इशारा दिला आहे. जगभरातील अनेक प्रमुख देश लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत निर्णय घेत असले तरी त्यामुळे रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ दिसून येऊ शकते असे आरोग्य संघटनेने बजावले आहे. जोपर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेला अखेरचा रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत धोका संपला असे म्हणता येणार नाही, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

leave a reply