मार्चपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण सुरु होण्याची शक्यता

१२ ते १४नवी दिल्ली – १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण सध्या देशभरात सुरू आहे. या वयोगटातील तीन कोटीहून अधिक मुलांचे लसीकरण झाले आहे. तमिळनाडूसारख्या राज्यात आतापर्यंत या वयोगटातील १०० टक्के मुलांना लसींचा पहिली डोस मिळााला आहे. सर्व राज्यांमध्ये या वयोगटातील मुलांचे लसीकरण पुर्ण झाले की दुसर्‍या टप्प्यात १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाईल. मार्चपासून या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.

द नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशन इन इंडिया (एनटीएजीआय) या केंद्र सरकारच्या कोरोनाविरोधातील लढाईच्या वर्कींग ग्रुपचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी लहान मुलांच्या लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोनाच्या साथीत लहान मुलांना संसर्गाचा धोका असल्याने लहान मुलांचे लसीकरण लवकर व्हावे याचे सरकारचे प्रयत्न आहेत. सरकारने गेल्यावर्षी कोव्हॅक्सिन आणि झायडस कॅडिलाच्या जायकोव्ह-डी या दोन लसींना लसीकरणासाठी परवानगी दिली होती. यातील जायकोव्ह-डी ही लसींचे तीन डोस द्यावे लागतात. मात्र सरकारने सध्या कोव्हॅक्सिन या लसींद्वारेच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे.

१२ ते १४तीन जानेवारीला १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाल्यापासून देशभरात आतापर्यंत ३.४८ कोटी मुलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. या वयोगटातील सात कोटी ४० लाख ५७ हजार इतकी मुलांची संख्या देशभरात आहे. जानेवारीच्या अखेरीपर्यंत या वयोगटातील सर्व मुलांना लसीचा पहिला डोस मिळेल, असा अंदाज एनटीएजीआयचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी व्यक्त केला आहे. तसेच फेब्रुवारी अखेरीपर्यंत या वयोगटातील मुलांना लसीचे दोन्ही डोस मिळालेले असतील. कोव्हॅक्सिनच्या दोन लसमधील अंतर २८ दिवसांचे आहे. त्यामुळे दोन महिन्यात १५ ते १८ वर्षवयोगटातील मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्यावर दुसर्‍या टप्प्यातील लसीकरण सुरू होईल. दुसर्‍या टप्प्यात १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चपासून सुरू होऊ शकेल, असे अरोरा म्हणाले. याबाबतीत लवकरच सरकार धोरणात्मक निर्णय घेईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

डॉ. अरोरा हे पहिल्यापासून लसीकरण कार्यक्रमाशी जोडलेले असून सरकारला कोरोना साथीबाबत सल्ला देणार्‍या वर्कींग ग्रुपचेही अध्यक्ष असल्याचे त्यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेचे महत्त्व वाढते. देशात १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांची संख्या साडेसात कोटी इतकी असल्याची माहिती त्यांनी दिली.

leave a reply