भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची अफगाणिस्तान, म्यानमारबाबत युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणप्रमुखांशी चर्चा

परराष्ट्रनवी दिल्ली – युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र व सुरक्षाविषयक धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांच्याशी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी फोनवरून चर्चा केली. भारताचे युरोपिय महासंघाबरोबरील धोरणात्मक सहकार्य व अफगाणिस्तान आणि म्यानमारमधील घडामोडींचे मुद्दे या चर्चेत अग्रस्थानी असल्याचे सांगितले जाते. युरोपिय महासंघाचे अध्यक्षपद फ्रान्सकडे आले असून महासंघाच्या भारतबरोबरील सहकार्यासाठी आपण भरीव योगदान देणार असल्याची घोषणा फ्रान्सने केली आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या बोरेल यांच्याबरोबरील चर्चेबरोबरच फ्रान्सने केलेल्या या दाव्याचीही बातमी प्रसिद्ध झाली आहे.

भारत व युरोपिय महासंघामध्ये मुक्त व्यापारी करारावर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर, उभयपक्षी व्यापार, गुंतवणूक, दळणवळण सुविधा, हवामानबदलाच्या विरोधातील कारवाई तसेच धोरणात्मक पातळीवरील सहकार्याच्या मुद्यावर बोरेल यांच्याशी आपली चर्चा पार पडल्याची माहिती जयशंकर यांनी दिली. तसेच सार्‍या जगाच्या चिंतेचा विषय ठरत असलेले अफगाणिस्तान व म्यानमार या देशांबाबतही आपण बोरेल यांच्याशी चर्चा केल्याचे जयशंकर पुढे म्हणाले. गेल्या पाच दिवसात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी फ्रान्स, पोलंड, स्विडन, हंगेरी, पोर्तुगाल, नेदरलँड या युरोपिय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली होती.

तर ब्राझिल, अर्जेंटिना या लॅटिन अमेरिकन देशांबरोबर जपान, श्रीलंका या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशीही जयशंकर यांचे फोनवरून बोलणे झाले आहे. या वर्षाच्या सुरूवातीला अमेरिका व रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी तसेच पुढच्या काळात ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मालदीव व भूतानच्याही परराष्ट्रमंत्र्यांशी जयशंकर यांनी चर्चा केली होती. आता युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र व सुरक्षाविषयक धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांच्याबरोबरील भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, फ्रान्स युरोपिय महासंघाच्या अध्यक्षपदाचा वापर फभारत व महासंघामधील सहकार्य नव्या धोरणात्मक उंचीवर नेण्यासाठी करील, असे फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युअल लेनेन यांनी म्हटले आहे.

इटली व स्विडन या युरोपिय देशांकडून पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरविली जातात. हे सहकार्य रोखण्यासाठी भारताने फ्रान्सला आवाहन केले असून याला फ्रान्सकडून प्रतिसाद मिळत असल्याची चिंता पाकिस्तानात व्यक्त करण्यात येत आहे.

leave a reply