साखर निर्यात चार पटीने वाढली

- साखर उत्पादनातही मोठी वाढ

साखर निर्यातनवी दिल्ली – भारतातून होणार्‍या साखर निर्यातीत चार पटीने वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ दरम्यान देशात तब्बल १७ लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली. गेल्यावर्षी याच कालावधीत केवळ ४.५ लाख टन साखर निर्यात करण्यात आली होती. साखर बाजार वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यातच झालेल्या विक्रमी साखर निर्यातीने व्यापार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, अशी माहिती द इंडियन शुगर मिल असोसिएशन (इस्मा) या साखर कारखान्यांच्या संघटनेने दिली आहे.

देशात साखर उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते सप्टेंबर हे साखर बाजार वर्ष मानले जाते. चालू साखर बाजार वर्षात १ ऑक्टोबर २०२१ पासून १५ जानेवारी २०२२ पर्यंत साखरेचे उत्पादन १५१.४१ लाख टनावर पोहोचले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १४२.७८ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यातील सर्वाधिक उत्पादन हे महाराष्ट्रात झाले आहे. महाराष्ट्रात ५८.८४ लाख टन इतके साखर उत्पादन १५ जानेवारीपर्यंत झाल्याची माहिती, इस्मातर्फे देण्यात आली. गेल्यावर्षी याच कालावधीत महाराष्ट्रात ५१.५५ लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले होते.

यानंतर उत्तर प्रदेशात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात गेल्या तीन महिन्यात ४०.१७ लाख टन साखर उत्तादन झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत ते सुमारे अडीच लाख टनाने कमी आहे. याच कालावधीत कर्नाटकातील साखर उत्पादन सुमारे तीन टनाने वाढून ३३.२० लाख टनावर पोहोचले आहे, असे इस्मातर्फे सांगण्यात आले.

देशातून वाढलेल्या साखर निर्यातीकडेही इस्माने लक्ष वेधले. एक ऑक्टोबर ते १५ जानेवारीदरम्यान देशात १७ लाख टन साखर निर्यात करण्यात आली आहे. ही साखर निर्यात गेल्यावर्षीच्या तुनलेत चार पट आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत केवळ ४.५ लाख टन इतकी साखर निर्यात करण्यात आली होती. तसेच या महिन्यात आणखी सात लाख टन साखरेची निर्यात होईल. यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याचेही इस्माने म्हटले आहे.

साखर निर्यातीसंदर्भातील आतापर्यंत ३० ते ४० लाख टनांचे करार पार पडले आहे. आणखी करारांसाठी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किंमती आणखी वाढण्याची वाट पाहिली जात असल्याचे इस्माने अधोरेखित केले आहे. ब्राझिलमधील साखर उत्पादन वर्ष एप्रिलपासून सुरू होत असून ब्राझिलमधील साखर बाजारात आल्यावर साखरेच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात पडतील. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किंमती पाच महिन्यांच्या निच्चांक स्तरावर आहेत. म्हणून यामध्ये सुधारणा होण्याची पुढील करारांकरीता व्यापारी, कारखानदार वाट पाहत असल्याचे इस्माने सांगितले आहे.

leave a reply