चीनच्या प्रयोगशाळेतूनच कोरोनाव्हायरस जगभर पसरला – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – ‘वुहानमधील वटवाघळामुळे कोरोनाव्हायरसचा प्रसार झाला, असा दावा चीन करीत आहे. हे वटवाघुळ वुहानच्या ४० मैलापर्यंतच्या अंतरावर नव्हते. त्यामुळे ते वुहानमधील फिश मार्केटमध्ये विक्रीसाठी आलेच नव्हते, हे लक्षात घ्यायला हवे. उलट प्राथमिक तपासात कोरोनाव्हायरस वुहानच्या प्रयोगशाळेतून बाहेर आल्याचे स्पष्ट होत आहे’, अशा थेट शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर हल्ला चढविला. इतकेच नाही तर अमेरिकेपेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणात या साथीने चीनमध्ये बळी घेतले आहेत. पण चीन याबाबत लपवाछपवी करत आहे, अशी टीका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे.

कोरोनाव्हायरस म्हणजे चीनचे जैविकशस्त्र असून चीनने साऱ्या जगावर याचा प्रयोग केला आहे, असे आरोप सुरू झाले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उघडपणे तसे संकेत दिले होते. ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, तैवान या देशांनीही अशा प्रकारचा संशय व्यक्त केला आहे. शुक्रवारी व्हाईट हाउसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यासंदर्भात चीनवर थेट हल्ला चढविला. विषाणूग्रस्त वटवाघुळ वूहानच्या फिश मार्केटमध्ये विक्रीसाठी आले व या मार्गाने कोरोनाव्हायरसचा प्रसार झाला, असा दावा चीन करीत आहे. मात्र ट्रम्प यांनी हा दावा पूर्णपणे उडवून लावला.

वुहानच्या सुमारे ४० मैल अंतरापर्यंत वटवाघळे नाहीत, याची जाणीव करून देऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनच्या या दाव्याची खिल्ली उडवली. प्राथमिक चौकशीत वुहानमधील प्रयोगशाळेतूनच हा विषाणू बाहेर पडल्याचे उघड होत असल्याचे, ट्रम्प म्हणाले. वुहानमधील या प्रयोगशाळेसाठी आधीचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जाहीर केलेला सुमारे ३७ लाख डॉलर्सचा निधीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला अमेरिकन संसदेच्या सदस्यांनी पाठिंबा घोषित केला आहे व पुढच्या काळात चीनच्या या प्रयोगशाळेला अधिक निधी मिळणार नाही, याची खातरजमा करून घ्या, अशी विनंती या संसद सदस्यांनी प्रशासनाला केली आहे.

कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक बळी गेलेला देश, अशी अमेरिकेची ओळख बनली असून अमेरिकेत या साथीने अडतीस हजार जणांचा बळी घेतला आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ही बाब मान्य नाही. या साथीमुळे अमेरिकेत दगावलेल्यांपेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणात चीनमध्ये बळी गेले आहेत. पण चीन याबाबतची माहिती उघड करायला तयार नाही, याकडे ट्रम्प यांनी लक्ष वेधले. गेल्या काही दिवसात आपल्याकडील बळींच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे चीन सांगत आहे खरे. पण प्रत्यक्षात ही चीनमधील बळींची संख्या सांगितली जाते त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे, असा दावा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी देखील चीनने कोरोनाव्हायरसच्या साथीबाबत स्वतःला आरोपमुक्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले होते. तर शुक्रवारीच ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांनी कोरोनाव्हायरसची साथ टळली तरीही ब्रिटनचे चीन बरोबरील संबंध सुरळीत होणार नसल्याची ग्वाही दिली होती. यामुळे अमेरिका, ब्रिटनने चीनच्या विरोधात उघडपणे भूमिका घेण्यास सुरुवात केली असून पुढच्या काळात या दोन्ही देशांकडून चीन वरील टीकेची धार अधिकाधिक तीव्र होत जाईल, असे स्पष्टपणे दिसत आहे.

चीनने अपेक्षित भूमिका घेतली नाही, तर राजनैतिक पातळीवरील संघर्ष अटळ आहे व त्याचे पर्यावसन आर्थिक संघर्षातही होऊ शकते, अशी परखड जाणीव अमेरिका, ब्रिटनसारखे देश चीनला वेगवेगळ्या मार्गाने करून देत आहेत. एव्हाना चीनला देखील याची जाणीव झाली आहे. म्हणूनच चीन आपल्यावरील या टीकेला उत्तर देताना आक्रमक भाषेचा प्रयोग टाळत असल्याचे दिसते.

leave a reply