देशात कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या 452 वर

रूग्णांची संख्या 14 हजारावर

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) – देशातील कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या 450 च्या पुढे पोहोचली असून रूग्णांची संख्या सुमारे 14 हजारावर गेली आहे. गेल्या 24 तासात हजारपेक्षा जास्त नवे रूग्ण देशभरात आढळले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 3,320 रूग्णांची नोंद झाली आहे. 

देशात 1 एप्रिलपासून आत्तापर्यंत कोरोनाव्हायरसच्या संसर्गाचा दर 40 टक्क्यांनी घटल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी केला आहे. लॉकडाऊनच्या आधी दर तीन दिवसांनी रूग्णांची संख्या दुप्पट होत होती तर आता सात दिवसांनी रूग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. शुक्रवारी विशेष मंत्रीगटाच्या पार पडलेल्या बैठकीत लॉकडाऊन, चाचणी किट यावर चर्चा झाल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. 

देशात या साथीमुळे होणारा प्रत्येक मृत्यू हा चिंतेचा विषय आहे त्यामुळे ही साथ रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे अग्रवाल म्हणाले. सरकार कोरोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट मोठ्या प्रमाणावर आयात करण्यात आले आहेत. मात्र तरीही हे किट्स कमी पडू शकतात, हे लक्षात घेऊन मे महिन्यापर्यंत देशातच 10 लाख रॅपिड टेस्टिंग किट्स बनविण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. 

शुक्रवारी सायंकाळपर्यंत देशात कोरोनाव्हायरसमुळे 452 जण दगावल्याची नोंद झाली. तर एकूण रूग्णांची संख्या 13 हजार 835 झाली आहे. यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात 3320 रूग्ण, दिल्लीत 1640, तामिळनाडूत 1323, राजस्थानात 1193 आणि मध्यप्रदेशात 1164 रूग्ण आढळले आहेत. या पाच राज्यानंतर गुजरात हजारपेक्षा जास्त रूग्ण आढळलेले सहावे राज्य ठरले आहे. 

शुक्रवारी मुंबईत  या साथीमुळे पाचजण दगावले आहेत. यामुळे एकट्या मुंबईत या साथीत बळी गेलेल्यांची संख्या 121 झाली आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 77 नव्या रूग्णांची नोंद झाली असून एकूण रूग्णांची संख्या 2,120 वर पोहोचली आहे. गेल्या आठवडाभरात एका दिवसात नोंद झालेली मुंबईतील ही सर्वात कमी रूग्ण संख्या आहे. 

leave a reply