‘डीआरडीओ’ने विकसित केलेले कोरोनावरील ‘२डीजी’ औषध बाजारात दाखल

नवी दिल्ली – संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले कोरोनावरील ‘२डीजी’ हे औषध बाजारात आले आहे. सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते या औषधाची पहिली बॅच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. जूनच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत हे औषध देशातील सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देेशात खास कोरोनावर उपचारासाठी बनलेले पहिले औषध आहे व हे औषध पुढील काळात कोरोना रुग्णलयांवरील उपचारासाठी अतिशय महत्त्वाचे सिद्ध होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

‘२डीजी’कोरोनावरील ‘२-डिऑक्सी-डी-ग्लूकोज’ (२-डीजी) हे औषधात ट्यूमर व कॅन्सर पेशींवर उपचारावरील वापरण्यात येणार्‍या औषधाच्या सहाय्याने विकसित करण्यात आले आहे. ८ मे रोजी ‘द ड्रग्ज् कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने या औषधाच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. ‘२डीजी’ तीन्ही टप्प्यातील चाचण्यांमध्ये कोरोना रुग्ण या औषधामुळे झपाट्याने बरा होत असल्याचे, तसेच ऑक्सिजन कमी झालेल्या रुग्णांची बाहेरुन देण्यात येणार्‍या ऑक्सिजनवरील निर्भरता कमी झाल्याचे लक्षात आले होते.

आतापर्यंत कोरोनावरील उपचारासाठी हायड्रॉक्लोरोक्विन, रेमडीसिवीर, आयवरमेन्टिन सारखी इतर साथींच्या आजारांवरील औषधे वापरण्यात येत होती. तसेच सौम्य कोरोना असलेल्यांवर उपचारासाठी विकसित करण्यात आलेल्या औषधांचा वापर केला जात होता. मात्र रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता असलेल्या व ऑक्सिजन पातळी कमी होत असलेल्या रुग्णांसाठी ‘२डीजी’च्या रुपाने विशेष औषध उपलब्ध झाले आहे.

पावडर स्वरुपात असलेले हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाण्यात मिसळून घ्यायचे असून या औषधाच्या एका पाकिटाची किंमत ५०० ते ६०० रुपये असल्याचे सांगण्यात येते. डॉ. रेड्डीज कंपनीकडून या औषधाचे उत्पादन घेतले जात आहे.

leave a reply