आर्मेनिया-अझरबैजानमध्ये नव्या संघर्षाचे संकेत

येरेवान/बाकु – गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रशियाच्या मध्यस्थीने थांबलेल्या ‘आर्मेनिया-अझरबैजान’ युद्धाचा पुन्हा भडका उडण्याचे संकेत मिळत आहेत. अझरबैजानच्या लष्कराने गेल्या आठवड्यात आर्मेनियाच्या हद्दीत घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशनियान यांनी सीमेवरील तणाव वाढत असल्याचे बजावले आहे. मात्र अझरबैजानने सीमा निश्‍चित करण्यासाठी लष्कराकडून प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून तणावाचे वृत्त फेटाळले आहे.

आर्मेनिया-अझरबैजानमध्ये नव्या संघर्षाचे संकेतमध्य आशियातील आर्मेनिया व अझरबैजानमध्ये गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जबरदस्त युद्ध भडकले होते. ‘नागोर्नो-कॅराबख’ प्रांताच्या नियंत्रणावरून झालेल्या या युद्धात तुर्कीने अझरबैजानच्या बाजूने उडी घेतली होती. त्याचवेळी आर्मेनियाचा पाठिराखा असणार्‍या रशियाने मात्र सहाय्य करण्यात आखडती भूमिका घेतली होती. तुर्कीच्या समर्थनाच्या बळावर अझरबैजानने आर्मेनियाचा पराभव करण्यात यश मिळविले होते. ४४ दिवसांच्या युद्धानंतर रशियाच्या मध्यस्थीने झालेल्या शांतीकरारात आर्मेनियाला मोठ्या भूभागावरील ताबा सोडणे भाग पडले होते.

त्यानंतर गेले काही महिने या भागात असलेली शांतता पुन्हा एकदा भंगण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या आठवड्यात अझरबैजानच्या लष्कराने आर्मेनियाच्या हद्दीत तब्बल साडेतीन किलोमीटर अंतरावर घुसखोरी केल्याचे समोर आले. स्यूनिक प्रांतात असलेल्या ‘सेव लेक’ या तळ्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न अझरबैजानच्या लष्कराने केला. मात्र आर्मेनियन लष्कराने आक्रमक तैनाती करून इशारे दिल्याने हा प्रयत्न उधळला गेला, अशी माहिती सूत्रांनी दिली.आर्मेनिया-अझरबैजानमध्ये नव्या संघर्षाचे संकेत

या घटनेनंतर आर्मेनियाने तातडीने ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’ची बैठक बोलवून लष्करी तैनाती वाढविण्याचे संकेत दिले आहेत. त्याचवेळी आर्मेनियाच्या हद्दीत घुसलेल्या अझरबैजानी फौजांमुळे तणाव वाढत असून त्यांनी तातडीने माघार घ्यावी, असा इशाराही देण्यात पंतप्रधान पशनियाने यांनी दिला. आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी या मुद्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी संवाद साधल्याची माहितीही देण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही अझरबैजानच्या लष्कराने माघारीचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

आर्मेनिया-अझरबैजानमध्ये नव्या संघर्षाचे संकेतअझरबैजान सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीत, लष्कराने पुढाकार घेऊन नव्या भागांमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र आर्मेनियाबरोबरील सीमा निश्‍चित करण्याच्या प्रक्रियेसाठी या हालचाली करीत असल्याचे स्पष्ट केले. अझरबैजानकडून करण्यात आलेल्या हालचालींवर अमेरिका व फ्रान्सकडून प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तर फ्रान्सने आक्रमक भूमिका घेऊन, अझरबैजानने माघार घ्यावी असे बजावले आहे.

या प्रकरणात रशियाने घेतलेली भूमिका घटनेचे गूढ वाढविणारी ठरली आहे. आपण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत व स्थिती सामान्य होण्यासाठी सर्व सहाय्य करु, असे रशियाकडून सांगण्यात आले. नोव्हेंबरमध्ये झालेल्या शांतीकरारानंतर आर्मेनिया व अझरबैजान सीमाभागात रशियन शांतीसैनिक तैनात आहेत. असे असतानाही अझरबैजानच्या लष्कराने घुसखोरी करणे आणि त्यानंतर रशियाने लक्ष असल्याचा दावा करणे लक्षणीय ठरते.

leave a reply