सोन्याचे दर तीन महिन्यांमधील उच्चांकी पातळीवर

लंडन – सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरांनी ०.६ टक्क्यांची उसळी घेऊन प्रति औंस (२८.३४ ग्रॅम) १,८५४ डॉलर्सचा टप्पा गाठला. सोन्याच्या दरांनी गेल्या तीन महिन्यात गाठलेली ही सर्वोच्च पातळी ठरली आहे. अमेरिकी डॉलरची घटलेली मागणी व आशियाई देशांमधील कोरोनाची वाढती साथ यामुळे दरांनी उसळी घेतल्याचे सांगण्यात येेते.

सोन्याचे दरअमेरिकेत रोजगारासंदर्भात आलेला अहवाल अपेक्षाभंग करणारा ठरला आहे. त्यामुळे डॉलरच्या मागणीवर परिणाम झाला असून अमेरिकी कर्जरोख्यांवरील दरांमध्ये घट झाली आहे. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला सिंगापूर, तैवान व काही प्रमुख आशियाई देशांमध्ये कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने सोन्याची मागणी व दर वाढल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबरोबरच अमेरिकेतही सोन्याच्या दरांनी उसळी घेतली असून दर प्रति औंस १,८५३ डॉलर्सवर पोहोचले आहेत. सोन्याबरोबरच चांदी व प्लॅटिनमच्या दरांमध्येही वाढ नोंदविण्यात आली आहे.

leave a reply