इराणमधील कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या दोन हजारांच्या पुढे    

इराणमध्ये कोरोनाव्हायरस थैमान घालत असून या साथीच्या इराणमधील बळींची संख्या दोन हजारच्याही पुढे गेली आहे. गेल्या २४ तासात इराणमध्ये याचे १४३ बळी गेले आहेत. तर एका दिवसात या साथीच्या २,२०६ नव्या रुग्णांची भर पडल्याची माहिती इराणच्या आरोग्यमंत्रालयाने दिली.

१९ फेब्रुवारी रोजी इराणमध्ये कोरोनाव्हायरसचे दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर महिनाभराच्या कालावधीत इराणमधल्या कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या २७ हजारांवर जाऊन पोहोचली. चीन, इटली आणि स्पेननंतर इराणमध्ये कोरोनाव्हायरस हाहाकार माजवित आहे. त्यात २४ तासात इराणमध्ये १४३ जणांचा बळी गेल्यानंतर इराणच्या सरकारने कोरोनाव्हायरसच्या विरोधात अधिक कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. इराणच्या सरकारने अंतर्गत प्रवासावर बंदीची घोषणा केली. तसेच इराणच्या लष्कराने राजधानी तेहरानमध्ये २,००० बेडसचे हॉस्पिटल उभारले आहे.

दरम्यान, अमेरिकेने इराणवर लादलेल्या कठोर निर्बंधामुळे इराणला कोरोनाव्हायरसच्या विरोधात लढा देण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे अमेरिकेने हे निर्बंध मागे घ्यावे अशी मागणी इराणने केली आहे.

leave a reply