‘कोरोनाव्हायरस’च्या विरोधात भारतीय लष्कराचे ‘ऑपरेशन नमस्ते’ 

नवी दिल्ली –  देशाचे लष्कर तंदुरुस्त असेल  तर  अधिक समर्थपणे देशाची सुरक्षा करू शकेल म्हणूनच कोरोनाव्हायरसची साथ आलेली असताना जवानांनी स्वतःला फिट राखणे अत्यावश्यक ठरते,  असे सांगून भारतीय लष्कर प्रमुख  जनरल  मनोज  मुकुंद नरवणे  यांनी ‘ऑपरेशन नमस्ते’ची घोषणा केली.

सीमेवर तैनात असलेल्या तसेच विविध मोहिमांमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या जवानांची लष्कराकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे ,अशी ग्वाही लष्करप्रमुखांनी या जवानांच्या कुटुंबीयांना दिली. त्याचवेळी तुमच्या कुटुंबाची पूर्ण  काळजी घेतली जाईल असे आश्वासन जनरल नरवणे यांनी जवानांना दिले आहे.

याबरोबरच देश  कोरोनाव्हायरसचा सामना करीत असताना  लष्कर देखील  या साथीच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज असल्याची घोषणा  जनरल नरवणे यांनी केली. भारतीय लष्कराच्या इतर मोहिमांप्रमाणे ही मोहीम देखील यशस्वी ठरेल, असा विश्वास  जनरल नरवणे यांनी व्यक्त केला.

याआधी भारताचे संरक्षण दलप्रमुख  जनरल बिपिन रावत  यांनी कोरोनाव्हायरसच्या  साथीचा सामना करण्यासाठी  संरक्षणदलांची सज्जता असल्याचे घोषित केले होते. कोरोनाव्हायरसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी लष्कराने  आपली हॉस्पिटल्स तयार ठेवल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

leave a reply